विजय शिंदे
अकोट : कोरोनाच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहे, परंतु बँक व पेट्रोल पंपावर केलेल्या प्रतिबंध सक्तीने शेतकऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण होत आहे. कोरोना रोखा, पण वेठीस धरू नका, असे पडसाद शेतकरी व सर्वसामान्यांमधून उमटत आहेत. अकोट मतदारसंघाचा वाली कोण, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पेट्रोल पंप व बँकेत व्यवहार करण्यासाठी कोरोना चाचणी केल्याचा अहवाल नसल्यास प्रवेश देण्यात येऊ नये, असा आदेश तहसीलदारांनी काढला आहे. कोरोना चाचणी व संसर्ग रोखण्यासाठी हा सक्तीचा पर्याय असला, तरी मात्र वयोवृद्ध पेन्शनधारक, दैनंदिन व्यवहार करणारे व्यापारी यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. तब्येत ठणठणीत असतानाही चाचणीत पॉझिटिव्ह निघणार का, अशी भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अकोटात पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना डिझेल देण्यास कोरोना चाचणी अट पुढे करीत पंपावर मनाई करण्यात आली होती, परंतु त्याचवेळी विकासकामे करण्यासाठी गौण खनीज पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांच्या टिप्पर वाहनांना विनाअट डिझेल मिळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश दिसून आला. कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करा; मात्र सक्तीचे नियम लादत वेठीस धरू नका, अशी जनभावना समोर येत आहे. विशेष म्हणजे दारू दुकानात दारू विकत घेण्यासाठी, मांसाहारी जेवणाच्या पार्सलकरितासुद्धा कोरोना चाचणी आवश्यक नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग हा पेट्रोल पंप व बँकेतच वाढतो काय, असा प्रश्न चर्चेला येत आहे.
----------------------------
कोविड केअर सेंटर वाढले; रुग्णसंख्या ओसरली!
अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असताना कोविड केअर सेंटर नसल्याने रुग्णांना अकोला येथे रेफर केले जात होते. सध्या कोविड केअर सेंटर वाढत आहेत, तर रुग्णसंख्या घसरत आहे. अशा स्थितीत प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी कोरोना चाचणी करण्यासाठी केलेली सक्ती प्रतिबंध चर्चेचा विषय ठरत आहे.
----------------------
पेट्रोल भरण्यासाठी कोविड-१९ चाचणीची अट शिथिल करण्यात आली असून, तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- नीलेश मडके, तहसीलदार, अकोट