अकोला : नोकर भरतीचे खासगीकरण थांबविण्याची मागणी करीत संम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने शहरात दि. १८ ऑक्टोबर रोजी इशारा मोर्चा काढण्यात आला. शेकडो युवकांसह मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
कंत्राटी नोकर भरती शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, सरकारी क्षेत्रातील खासगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, स्पर्धा परिक्षेसाठी राजस्थान राज्याच्या धर्तीवर एकच परिक्षा शुल्क आकारण्यात यावे, यासह विविध मागण्या करीत संम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने इशारा मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वात शास्त्री स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायदळ इशारा मोर्चा पार पडला. या मोर्चात जिल्हाभरातून युवक सहभागी झाले होते. विविध मागण्यांच्या घोषणेेने जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता. मोर्च्यात युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, विभागीय महासचिव बालमुकुंद भिरड, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष घोगरे, राजकुमार दामोदर, आशिष मांगुळकर आदी सहभागी झाले होते. मोर्चाचे संचालन अॅड. मिनल मेंढे, तर प्रास्ताविक सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे केले.
ह्या आहेत प्रमुख मागण्यासमूह शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द करावा, सर्व शासकिय रिक्त पदांची भरती तातडीने करावी, राज्यसेवा व सरळसेवा पदभरती महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या मार्फत करावे, पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करण्यात यावा, शिक्षणाचे खासगीकरण तातडीने थांबवावे, केंद्र राज्य सरकारच्या विविध परिक्षांसाठी तालुका स्तरावर परिक्षाकेंद्र सुरु करावे, प्रलंबीत शिष्यवृत्ती आणि स्वाधारचा निधी तत्काळ वितरीत करवा, शासकिय वस्तीगृहातील भत्ता व स्टेशनरीमध्ये वाढ करावी, शिक्षक भरती, कंत्राटी शिक्षक, शाळा दत्तक देणे बाबतीत केलेले बेकायदा नियम रद्द करावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.