९५ वर्षांचे महादेव भगत काेरोनामुळे नातीकडे मुंबईला क्वारंटाइन आहेत, तर ८४ वर्षीय कलावती आजी ही मुलाकडे अकोल्याला राहत आहेत. नातीच्या हट्टामुळे आजोबा काही दिवस मुंबईला आरामासाठी आले होते. त्यांना तिथे कोरोनाची लागण झाली आणि ते मुंबईत अडकले. आजाेबा सध्या बरे आहेत. त्यांचा ऑक्सिजनही लेव्हलही ९७ आहे. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार, ते घरात आहेत. आजीला मात्र ते ‘मिस’ करीत होते. आजोबांना कोरोना झाल्याचे आजीला माहितीच नव्हते. बऱ्याच दिवसांपासून आजोबांचा फोन नाही, म्हणून आजीने मुलाकडे हट्ट धरला. त्यावर मुलाने व्हिडीओ काॅल लावून देत दोघांची भेट करून दिली. उल्लेखनीय म्हणजे, या दोघांच्या आयुष्यातील हा पहिला व्हिडीओ काॅल आणि एकमेेकांपासून एवढे दिवस दूर राहण्याचीही ही पहिलीच वेळ. आपल्या मुलाला आजी म्हणू लागली की, मला म्हाताऱ्याची सेवा करायची आहे. मला त्यांच्याजवळ जायचे आहे आणि तुम्ही हे नवं नवं काय सांगताय रोज... हात धुवा... गरम पाणी प्या... आमच्या काळात नव्हतं असलं काही... कदाचित तुम्हाला हे आजीचे शब्द ऐकून हसू येईल... पण त्यामागं आजीचं आबावरील प्रेमही दिसून येते.
जेव्हा व्हिडीओ काॅलमध्ये या दोघांची भेट झाली, तेव्हा या दोघांच्या चेहऱ्यावरचं समाधान, प्रेम, आनंद अवर्णनीय असा होता. प्रेमाची माणसं एकमेकांच्या जवळ असली, तर आपण आजारावरही मात करू शकतो. या कोरोनाच्या संकटमय काळात आपल्या नात्यांना दूर जाऊ देऊ नका, नाती सांभाळा, असा सल्लाही या दोघांनी दिला आहे.
फाेटो: