नितीन गव्हाळे, अकोला: प्लास्टिक उत्पादनांमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. प्लॅस्टिकची निर्मिती पेट्रोकेमिकल्सपासून होत असल्याने, फॉसिल हायड्रो कार्बनपासून तयार होतात. त्याचे विघटन होत नाही आणि त्यातून मायक्रोप्लॅस्टिक कण तयार होतात. मायक्रोप्लॅस्टिक आपल्या अन्नाच्या स्रोतात मिसळून मानवी शरीराला घातक आहे. याचा सारासार विचार करून तेल्हारा येथील सेठ बंसीधर विद्यालयाचा संशोधक विद्यार्थी चिन्मय रामदास घावट याने गव्हाच्या कांड्यापासून स्ट्रॉ बनविले. या स्ट्रॉ ने कराड येथील बारावे राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनात अव्वल स्थान पटकावले. या मॉडेलची राष्ट्रीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान अहमदाबाद, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने बारावे राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड जि. सातारा येथे २२ ते २४ एप्रिल रोजी पार पडले. महाराष्ट्रातील निवडक १३१ मॉडेल सहभागी झाले होते. त्यापैकी १३ मॉडेलची राष्ट्रीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनासाठी निवड झाली. यामध्ये तेल्हारा येथील चिन्मय घावट याने विज्ञान शिक्षक विवेक साबळे यांच्या मार्गदर्शनात इको फ्रेंडली स्ट्राॅ फ्रॉम व्हीट हे मॉडेल तयार केले. यावेळी त्याचे मॉडेल उत्कृष्ट ठरले असून, चिन्मयच्या मॉडेलला इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबईचे प्रा. डॉ. दीपक पिंजारी, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर संचालक डॉ. राधा अतकरी, प्रा. डॉ. राजकुमार अवसरे, राजू नेत, दिलीप चव्हाण, एनआयएफचे विरल चौधरी, अनंत गुप्ता ,प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार, इन्स्पायर अवार्ड राज्य सहसमन्वयक प्रा. डॉ. रवींद्र भास्कर आदींनी पुरस्कार प्रदान केला.प्लास्टिकला पर्याय म्हणून असे तयार केले स्ट्रॉ
प्लास्टिकला पर्याय म्हणून गव्हाच्या कांड्यापासून स्ट्रॉ तयार केले आहे. गहू काढणी झाल्यानंतर उरलेला भाग जाळण्यात येतो. तो न जाळता गव्हाच्या कांड्यापासून इको फ्रेंडली स्ट्रॉ तयार केले जाऊ शकतात. सामाजिक उपयोगिता व प्रदूषणमुक्त आणि अत्यंत अल्प खर्चात तयार झालेल्या स्ट्रॉची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.