अकोला: शहरातील पथदिव्यांबाबत तक्रारी व कुरबुरी लक्षात घेता, महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी पथदिवे देखभाल-दुरुस्तीचे प्रभागनिहाय कंत्राट रद्द करून झोननिहाय दिले. नागरिकांच्या तक्रारींचे निरसन दोन दिवसांच्या आत न झाल्यास संबंधित कंत्राटदाराला दंड करण्याची तरतूद आहे. गत दोन महिन्यांमध्ये निकाली न निघालेल्या तक्रारींच्या बदल्यात कंत्राटदाराला १ लाख ६८ हजार रुपये दंड आकारण्यात आला. प्रभागातील साफसफाईचे कंत्राट असो वा पाच मजूर पद्धती, या प्रत्येक कामात खिसे भरण्याची सवय नगरसेवक, कंत्राटदार आणि संबंधित विभागाला जडली आहे. हाच कित्ता शहरातील पथदिव्यांबाबत गिरवला जात होता. २0१२ पूर्वी शहरातील पथदिवे देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट एशियन कंपनीकडे देण्यात आले होते. सोडियम पथदिव्यांमुळे विजेची उधळपट्टी होत असल्याने वीजबचतीसाठी एशियन कंपनीला शहरात ह्यसीएफएलह्ण लाइट लावण्याची परवानगी देण्यात आली; मात्र या पथदिव्यांचा उजेड पडत नसल्याने मुख्य रस्त्यांसह प्रभागात अंधाराची स्थिती कायम होती. २0१२ मध्ये तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसप्रणीत आघाडीने एशियन कंपनीचे कंत्राट रद्द करून प्रभागनिहाय पथदिवे देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट दिले. या कामाचे कंत्राट नगरसेवकांच्या नातेवाइकांनी मिळवत लाखो रुपयांच्या देयकांवर ताव मारला. हा विचित्र प्रकार आयुक्त अजय लहाने यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी झोननिहाय कंत्राट दिले. नागरिकांच्या तक्रारीसाठी मनपात तक्रार निवारण कक्ष गठित करीत हेल्पलाइन क्रमांक जारी केला. मनपाला तक्रार प्राप्त होऊन दोन दिवसांच्या आत ती निकाली न निघाल्यास कंत्राटदाराला दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार १ ऑक्टोबर ते ३0 नोव्हेंबर या कालावधीतील तक्रारी ध्यानात घेता, प्रशासनाने कंत्राटदाराला १ लक्ष ६८ हजार रुपये दंड बजावला.
पथदिवे बंद; कंत्राटदाराला दंड
By admin | Published: December 30, 2015 2:11 AM