अकोला: शहराच्या मुख्य मार्गावरील दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती, खांबाची रंगरंगोटी करण्याच्या नावाखाली पथदिव्यांची यंत्रणा कोलमडली आहे. परिणामी, मुख्य रस्त्यांवर अंधार पसरला असून, या समस्येकडे महापालिकेचा विद्युत विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, प्रभागातील पथदिव्यांचा बोजवारा उडालेला असताना झोननिहाय नियुक्त केलेल्या कंत्राटदारांनी झोपेचे सोंग घेतल्याची परिस्थिती आहे.आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी प्रमुख रस्ते, चौकांमध्ये एलईडी पथदिवे उभारण्यासाठी शासनाकडून १० कोटींचा निधी मिळविला. त्यामध्ये मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटींची तरतूद करीत २० कोटींच्या कामाचे कार्यादेश जारी केले. शहरात रॉयल इलेक्ट्रॉनिक कंपनीकडून पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश असून, काम ७० टक्के पूर्ण झाल्याचा दावा मनपाच्या विद्युत विभागाकडून केला जात आहे. शहरात एलईडीच्या लख्ख उजेडाचे कौतुक केले जात असले, तरी मागील सहा महिन्यांच्या कालावधीत पथदिव्यांची यंत्रणा पूर्णत: कोलमडल्याची परिस्थिती आहे. मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद राहत असल्याने महापालिकेचा विद्युत विभाग व झोननिहाय नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्याची गरज आहे.दुरुस्तीच्या नावाखाली पथदिवे बंद!शहरातील मुख्य मार्गावरील पथदिवे सतत नादुरुस्त राहत असल्याचे चित्र आहे. दुभाजकांमधील खांबावर लावण्यात आलेल्या पथदिव्यांच्या दुरुस्तीला दोन-दोन महिन्यांचा कालावधी कसा लागू शकतो, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मध्यंतरी खांबांना कलर लावण्याचे काम सुरू होते. दीड महिन्यांचा अवधी होत असला तरी अद्यापही रंगरंगोटीचे काम सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. कंत्राटदाराच्या धिम्या गतीमुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.झोननिहाय कंत्राटदार करतात काय?पथदिव्यांची यंत्रणा सुरळीत चालावी, यासाठी मनपा प्रशासनाने पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी झोननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती केली. यामध्ये पूर्व व उत्तर झोनसाठी ए.जे. इलेक्ट्रिक, पश्चिम झोनसाठी शरद पॉवर कंट्रोल व दक्षिण झोनकरिता ब्राइट इलेक्ट्रिक अमरावती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्राइट इलेक्ट्रिक कंपनी वगळता उर्वरित तीनही कंत्राटदार स्थानिक असल्यामुळे त्यांना शहराच्या गल्लीबोळातील माहिती आहे. असे असले तरी नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करण्यासाठी कंत्राटदारांना मुहूर्त सापडत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.