महामार्गाचे काम संथगतीने
अकाेला : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या रूंदीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून सुरु असले तरी संथगतीमुळे वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. निमवाडी लक्झरी बस स्टॅंड, वाशिम बायपास चाैक, नवीन किराणा बाजार याठिकाणी अर्धवट रस्ता असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
निर्माणाधिन महामार्गावर वृक्षांची कत्तल
अकाेला : अकाेला ते पातूर मार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावर कडूनिंबाच्या वृक्षांची माेठी संख्या असून रस्ता रूंदीकरणादरम्यान बहुतांश वृक्षांची कत्तल केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने याेग्य नियाेजन केल्यास अनेक वृक्ष कायम राहू शकत असल्याने असे वृक्ष न ताेडण्याची मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.
वाशिम बायपास चाैकात सांडपाणी
अकाेला : प्रभाग क्रमांक १८ अंतर्गत येणाऱ्या वाशिम बायपास परिसरातील कमला नगरमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच मुख्य कमानीच्या बाजूला खासगी भूखंडात परिसरातील सांडपाणी साचले आहे. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून पर्यायी उपाययाेजना केली जात नसल्याने स्थानिक रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
जलकुंभ वाढली; डासांची पैदास
अकाेला : जुने शहरातील हरिहर पेठ स्थित दशेहरा नगरला जाेडणाऱ्या मुख्य नाल्याची मागील अनेक महिन्यांपासून साफसफाई न केल्यामुळे त्यामध्ये माेठ्या प्रमाणात जलकुंभ निर्माण झाली आहे. यामुळे घाण सांडपाण्याचा निचरा हाेत नसल्याने त्यामध्ये डासांची पैदास झाली असून इदगाह नजिक राहणाऱ्या नागरिकांचे आराेग्य धाेक्यात सापडले आहे.
नाले सफाईकडे मनपाची पाठ
अकाेला : डाबकी राेडवरील सरस्वती किराणा शाॅपसमाेरचा नाला घाणीने तुडुंब साचला आहे. या नाल्याच्या साफसफाईकडे प्रभाग क्रमांक १० मधील भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्यामुळे मनपाचे सफाई कर्मचारीही फिरकत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
भांडपुरा चाैकात ऑटाे चालकांची मनमानी
अकाेला : शहरातील ऑटाे चालकांना पाेलीस प्रशासनाचा कवडीचाही धाक नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. भांडपुरा चाैकातील पाेलीस चाैकीसमाेर पाेलिसांच्या नाकावर टिच्चून ऑटाे चालक प्रवाशांसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी वाहतुकीची काेंडी निर्माण हाेत असली तरी भांडपुरा पाेलिसांकडून काेणतीही कारवाई केली जात नाही.
शेतशिवारात रानडुकरांचा हैदाेस
अकाेला: तालुक्यातील अमानतपूर ताकाेडा, खडकी, भाैरद, भाेड येथील शेतशिवारामध्ये मागील काही दिवसापासून रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. रब्बीतील गहू, हरभरा तसेच हळद आदी पिकांची रानडुकरांनी नासाडी चालवली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे माेठे आर्थिक नुकसान हाेत असून वनविभागाने रानडुकरांचा बंदाेबस्त करण्याची गरज आहे.