लोकमत न्यूज नेटवर्कसिरसोली : विनयभंगाच्या कथित गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये बोलावल्यामुळे येथील गजानन इंगळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना २८ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. सदर युवकाच्या मृत्यूप्रकरणी ठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय नातेवाइकांसह ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे हे वृत्त लिहीपर्यंत गजानन इंगळेचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका गावातच उभी होती.सिरसोली येथील एक महिला शेतात जात असताना तिचा एका इसमाने विनयभंग केला होता. या घटनेबाबत आरोपीच्या नावासह हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती; पण हिवरखेड पोलीस स्टेशनांतर्गत सिरसोली येथील विनयभंगाच्या कथित प्रकरणात गजानन इंगळे यांना २४ जून रोजी पोलीस स्टेशनला चौकशीला बोलाविले होते. या कारणामुळे गजानन इंगळे यांनी २५ जून रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना, २८ जून रोजी सकाळी ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्याचा मृतदेह दुपारी ४ वाजता पोहोचताच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. इंगळेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या ठाणेदारासह अन्य लोकांना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंतिम संस्कार करणार नसल्याचा निर्णय घेऊन तो हिवरखेड पोलीस स्टेशनला आणण्याचा प्रयत्न त्याच्या नातेवाइकांसह ग्रामस्थांनी बुधवारी केला. हिवरखेडचे ठाणेदार कात्रे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह लोकांना अडविले, त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी ठाणेदार व पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, वातावरण चिघळले आहे. दरम्यान, संतप्त वातावरण पाहता एसडीपीओ यांनी हिवरखेड ठाणेदार यांना घटनास्थळावरून पाठवून दिले. सद्यस्थितीत गावात पोलीस ताफा तैनात आहे. गजानन इंगळे यांचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका सात-आठ तासांपासून सिरसोली-अडगाव रस्त्यावर हे वृत्त लिहीपर्यंत उभी असून, ठाणेदार कात्रे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीवर नातेवाईक-गावकरी ठाम आहेत. सध्या गावात तेल्हाराचे ठाणेदार, अकोला येथील कमांडो फोर्स तैनात आहेत. परिस्थिती हाताळण्याकरीता व घटनास्थळावरील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकांत सागर व आकोट शहर ठाणेदार सी.टी. इंगळे हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी कारवाईचे आश्वासन देत मृतकांच्या नातेवाईकासोबत चर्चा सुरू आहे. इंगळे मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हे दाखल!सिरसोली येथील गजानन इंगळे मृत्युप्रकरणी आरोपी मोबीन अली सफदर अली, इमदाद अली, इमरान अली इमदाद अली विरूध्द हिवरखेड पोलीसांत भादंवी ३०५, ३२३, ५०६, ३४ गुन्हे दाखल करण्यात आले. हिवरखेड पो स्टे अंतर्गत सिरसोली येथील विनयभंग प्रकरणातील चौकशी साठी बोलावलेल्या मृतक गजानन इंगळे यांचा पुरावा पोलीस घेत होते. पुरावा देऊ नको म्हणुन विनयभंग प्रकरणातील आरोपीने गजाननला जिवे मारण्याची धमकी दिली होती.त्यामुळे गजाननने विष प्राशन केले होते,अशी माहिती पोलीस सुत्राकडुन समोर येत आहे.
‘त्या’ युवकाच्या मृत्यूने सिरसोलीत तणाव!
By admin | Published: June 29, 2017 1:17 AM