अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्नप्रसंगांना अटी, शर्तींसह २५ व्यक्तींची परवानगी देण्यात आली आहे. परंतु काही मंगल कार्यालयांमध्ये नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. तसेच या ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात नागरिक एकत्र येऊन गर्दी करत असल्याचे निर्दशनास येत आहे. अशा मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात येत आहे. यापुढे अशा मर्यादा तोडणाऱ्या मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापकावर कारवाई करून मंगल कार्यालय सील करण्यात येणार आहे. तसेच या मंगल कार्यालयाचे सर्व लग्न व इतर कार्यक्रम रद्द करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.
लग्न व इतर समारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी ही कोरोना संसर्गाला आमंत्रणच आहे. यासाठी मंगल कार्यालय व्यवस्थापनासह लग्न कार्यालयात येणाऱ्या वधू-वर पक्षाकडील व्यक्तींनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून लग्न समारंभास २५ व्यक्तींच्या परवानगीपेक्षा जास्त संख्या होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे. अन्यथा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या कडक दंडात्मक कारवाईसह इतर कारवाईला सामोरे जावे लागेल याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
000000000000
१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनी लसीकरणासाठी गर्दी करू नये;
जिल्हाधिकारी यांचे आवाहन
अकोला : १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना १ मेपासून लसीकरण करता येणार नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर जनतेने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
गुरुवारी जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपअधिष्ठाता डॉ. कुसमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, डॉ. अष्टपुत्रे, डॉ. क्षीरसाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांची प्रमुख उपस्थिती होती. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनी कोविन पोर्टलवर नोंदणी झाली म्हणजे लसीकरण होणार, असे नसून त्याबद्दलची वेळ व तारीख ही नंतर कळविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी करणाऱ्या व्यक्तींवर संचारबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी.
000000000000