लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा कहर सुरुच असून, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात रविवार, ९ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून १५ मे रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीपासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये वैद्यकीय सेवा, औषधाची दुकाने (मेडिकल्स) व दुधाचे वितरण वगळता इतर सर्व दुकाने आणि आस्थापना बंद राहणार आहेत.
जिल्हयातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यू संख्या लक्षात घेता, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात ९ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, कडक निर्बंधांच्या सहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात वैद्यकीय सेवा, औषधाची दुकाने, दवाखाने आणि दुधाचे वितरण वगळता किराणा, भाजीपाला व इतर सर्वप्रकारची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, दुय्यम निबंधक कार्यालयासह सर्वच आस्थापना बंद राहणार आहेत. कडक निर्बंधांच्या कालावधीत वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी रविवारी रात्री १२ वाजल्यापासून करण्यात येणार असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत.
बॅंकाही सहा दिवस राहणार बंद!
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व बॅंका सहा दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे कडक निर्बंधांच्या कालावधीत जिल्ह्यातील बॅंकांचे कामकाज बंद राहणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, ९ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून जिल्ह्यात संपूर्ण कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. सहा दिवसांच्या कडक निर्बंधांच्या कालावधीत वैद्यकीय सेवा, मेडिकल, दवाखाने व दुधाचे वितरण वगळता इतर दुकाने व आस्थापना, शासकीय कार्यालये सुरु राहणार नाहीत. वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. या कालावधीत कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
- जितेंद्र पापळकर
जिल्हाधिकारी