अकोला: येत्या १० सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या श्री गणेश उत्सवाच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेत, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना शनिवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कायदा व सुव्यवस्थेसंबंधी बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. निलेश अपार, मुकेश चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तहसीलदार, पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते. श्री गणेश उत्सवात संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करण्याचे सांगत, गणपती मंडळांनी आवश्यक त्या परवानगी घेतल्याची खात्री करुन, परवानगी देताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. श्री गणेश स्थापनेच्या दिवशी गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घेऊन, त्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिल्या.
कोरोना संकटाची जाणीव
ठेवून उपाययोजना राबवा!
गणेशोत्सव साजरा करीत असताना कोरोनाचे संकट कायम असल्याची जाणीव ठेवून, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असून, कामात दिरंगाई व कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
..............फोटो.....................