अकोला : जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात हरित आच्छादन आणि जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन, वायू संवर्धन अग्नी व आकाश यासंदर्भात विविध उपाययोजना राबवून ‘माझी वसुंधरा ’ अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सांगत, यासंदर्भात जनगजागृती करण्यासाठी १ जानेवारी रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिले.
‘माझी वसुंधरा ’ अभियानासंदर्भात जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील उपाययोजनाव कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे यांच्यासह अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर नगरपालिका व बार्शिटाकळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी उपस्थित होते. ‘माझी वसुंधरा’ या अभियानाचा मुख्य उद्देश असलेल्या पर्यावरण संवर्धनाबाबत नगरपालिका क्षेत्रात १ जानेवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.