अकोला : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकारण पाहता, एप्रिलअखेरीस विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक झाली तर, उद्धव ठाकरे यांच्या गटाला एक राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीपासून वंचित राहावे लागण्याचीही शक्यता आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंंबेडकर यांनी सोमवारी अकोला येथे व्यक्त केले.
शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांनी, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मान्य करावा लागणार असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे यांच्याकडील पक्षाचे नाव व चिन्ह गेले असले तरी, आमच्या युतीवर त्याचा परिणाम होणार नाही. मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे.ही आमची वैयक्तिक युती आहे.
आगामी निवडणुकांसाठी युती उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली युती ही सन २०२४ पर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी आहे. त्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांचा समावेश असल्याचा पुनरूचचार आंबेडकर यांनी केला़ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांशीही माझे चांगले संबध आहेत. त्यामुळे त्यांना एकत्र आणण्यासाठी कोणताही प्रयत्न करणार नाही. त्या दोघांच्या भांडणात माझे काम नाही, असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
...तर एकटंच निवडणूक लढवू
आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली. त्यामुळे आम्हाला महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यावा लागणार आहे. महाविकास आघाडीबाबत उद्धव ठाकरे यांनी काही वेगळा निर्णय घेतला तर आम्ही पुन्हा एकला चलो रे ची भूमिका घेऊन, येत्या निवडणुकीला सामोरे जाऊ, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
माझे दाेन चेहरे
राजकारण, समाजकारणात वावरताना, माझे दोन चेहरे आहेत. एक भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा नातू आणि दुसरा राजकीय पक्षाचा प्रमुख. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांशी संबंध आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेली बैठक राजकीय नसून, ती इंंदू मिलमधील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी होती.