अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन शासकीय गोदामामध्ये ठेवल्या असून, या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन दिवसांसाठी हा खडा पहारा राहणार असून, यासाठी सीआयएसएफच्या एका तुकडीसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार आहे.खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया शासकीय गोदामात ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणीच मतमोजणी पार पडणार आहे. तेव्हा मतमोजणीची तारीख येईपर्यंत ईव्हीएम सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असून, सध्या सुरक्षेसाठी एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, ४० सशस्त्र पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ आणि सीआयएसएफ दलाचे प्रत्येकी एक प्लाटून असा पोलिसांचा ताफा या ठिकाणी तैनात राहणार आहे. यासह मूर्तिजापूर, बाळापूर, आणि अकोट या ठिकाणीही स्ट्राँग रूमवर खडा पहारा ठेवण्यात आला आहे. ईव्हीएमएची सुरक्षा ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्यासह बडे पोलीस अधिकारी वारंवार भेटी देऊन तपासणी करीत आहेत.