संतोष येलकर
अकोला : वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेंतर्गत गेल्या वर्षभरापासून जिल्हास्तरावर वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड समिती गठित करण्यात आली नाही. त्यामुळे योजनेंतर्गत जिल्ह्यातील नवीन वृद्ध साहित्यिक व कलावंतांची निवड करण्याची प्रक्रिया अडकली असून, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्राप्त वृद्ध साहित्यिक व कलावंतांचे ६५० अर्ज अद्याप प्रलंबित असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे निवड समिती केव्हा गठित होणार आणि नवीन वृद्ध साहित्यिक व कलावंतांची निवड होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेंतर्गत वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दरमहा २ हजार २५० रुपये मानधन दिले जाते. मानधनाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. त्यासाठी योजनेंतर्गत जिल्हास्तरावर वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड समितीमार्फत वृद्ध साहित्यिक व कलावंतांची निवड केली जाते. निवड करण्यात आलेल्या वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दरमहा मानधनाचा लाभ देण्यात येतो. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड समिती गठित करण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे; मात्र गत वर्षभरापासून निवड समिती गठित करण्यात आली नाही. त्यामुळे योजनेंतर्गत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे ६५० वृद्ध साहित्यिक व कलावंतांचे प्रस्ताव प्राप्त झाले असले तरी, निवड समिती गठित नसल्याने, प्राप्त झालेले प्रस्ताव प्रलंबित असून, नवीन वृद्ध साहित्यिक व कलावंतांची निवडप्रक्रिया रखडली आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तराव निवड समिती गठित केव्हा होणार आणि जिल्ह्यातील नवीन वृद्ध साहित्यिक व कलावंतांची मानधनासाठी निवड केव्हा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
५९१ वृद्ध साहित्यिक, कलावंतांना
दरमहा दिले जाते मानधन !
वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेंतर्गत जिल्ह्यात दीड वर्षापूर्वी निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ५९१ वृद्ध साहित्यिक व कलावंतांना सद्य:स्थितीत दरमहा २ हजार २५० रुपये मानधन दिले जात आहे. मानधनाची रक्कम वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते, अशी माहिती जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या सूत्रांनी दिली.
पालकमंत्र्यांच्या शिफारशीने
निवड समिती केव्हा होणार गठित?
वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेंतर्गत जिल्ह्यातील नवीन साहित्यिक व कलावंतांची निवड करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीने वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड समिती गठित होणे आवश्यक आहे. परंतु वर्षभरापासून अद्यापही निवड समिती गठित झाली नसल्याने, पालकमंत्र्यांच्या शिफारशीने जिल्हास्तरावर निवड समिती गठित होणार तरी केव्हा, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.