निंबा फाटा: महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची विद्यार्थी सवलत पास असतानाही विद्यार्थ्यांना तिकिटे घ्या अन्यथा बसमध्ये वाहकाने प्रवेश नाकारल्याची घटना १६ जुलै रोजी घडली. या प्रकरणी मुलींसह विद्यार्थ्यांना उद्धट वागणूक देणाऱ्या वाहकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी शेगाव आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.याबाबत प्राप्त माहितीनुसार सकाळी ७ वा. ४५ मी. तेल्हारा आगाराच्या तेल्हारा ते शेगाव बसमध्ये कारंजा रम येथून तर काही शाळकरी मुली व विद्यार्थी निंबा फाटा येथून शेगाव जाण्याकरिता बसमध्ये बसले. विद्यार्थी पास व ओळखपत्र वाहक भोजने यांना दाखविले; मात्र त्यांनी स्मार्ट कार्डची मागणी करीत तिकिटे घ्या अन्यथा पासवर विद्यार्थी व मुलींनाही प्रवेश नाकारला. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांनी तिकिटाकरिता पैसे नसून, प्रवास पासवर करू देण्याची विनंती या वाहकास केली; मात्र विद्यार्थ्यांची विनंती धुडकावत उद्धट वागणूक देत या वाहकाने विद्यार्थ्यांना तिकिटे घेण्यास भाग पाडले. एकीकडे दुष्काळी परिस्थितीत परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते विद्यार्थ्यांकरिता मोफत प्रवास सवलत योजना घोषित करतात व स्मार्ट कार्ड नसेल तरीही लिखित (मॅन्युअली) पासवर विद्यार्थ्यांना प्रवास करू द्यावा, असा आदेश असताना त्यांचेच वाहक विद्यार्थ्यांना वेठीस धरीत आहेत. याची गंभीर दखल घ्यावी व आमचे तिकिटाचे पैसे परत मिळावे व उध्दट वागणूक देणाºया वाहकावर कारवाईची मागणी फारेहाऊरूज अमीरखा पठाण, प्रज्वल तायडे, गणेश माळी या विद्यार्थ्यांनी वाहतूक निरीक्षक पुरुषोत्तम बगाडे यांच्यामार्फत आगार व्यवस्थापक शेगाव यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांची माझ्यापर्यंत तक्रार आली नाही. तक्रार आल्यास चौकशी करून वाहकावर कारवाई करण्यात येईल.- संतोष वानेरे, आगार व्यवस्थापक, तेल्हारा