- विजय शिंदेअकोटःमेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सातपुड्यातील जंगलात चक्क एक साथ चार वाघ आढळून आले. जंगलाचा राजा बिनधास्तपणे फिरत असताना पाहून मेळघाट सफारीवर असलेल्या पर्यटकांनी या वाघांना कॅमेरामध्येच नव्हे तर आपल्या डोळ्यात सुद्धा कैद केल्याची घटना 27 एप्रिल रोजी घडली.नागपूरच्या फॉरेन्सिक कॉलेजचा अभ्यास दौरा निमित्त प्राध्यापक अर्चना म्हाळकर व त्यांचे विद्यार्थी अकोट तालुक्यातील शहानुर याठिकाणी आले होते. त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसात वन्य प्राण्यांचे दर्शन व्हावे, म्हणून वन विभागाच्या जंगल सफारी मधून धारगड, बोरी या परिसराची भ्रमंती केली. यावेळी उन्हाळ्याच्या दिवसात वाढलेल्या गवतातून एक नव्हे तर तब्बल चार वाघ व काही अंतरावर एका बिबट्याचे दर्शन त्यांना झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळुन वाघ पाहण्याचीही पहिलीच संधी असल्याने प्राध्यापक अर्चना महाडकर व त्यांचे विद्यार्थी चांगले स्तब्ध झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून वाघाचे शूटिंग घेतले तसेच फोटो पण काढले.यावेळी प्रत्यक्ष डोळ्यासमोर वाघाची प्रगती पाहून त्यांनी हा संपूर्ण थरारक प्रसंग आपल्या डोळ्यांमध्ये साठवला. केवळ वाघाची नाही तर इतर वन्य प्राण्यांचे सुद्धा त्यांना दर्शन झाले. विशेष म्हणजे सातपुड्याच्या जंगलात जंगल सफारीवर अर्चना म्हाळकर ह्या नागपूर वरून अनेकदा आल्या. परंतु त्यांना एकदाही वाघाचे दर्शन झाले नाही यावेळेस मात्र चार वाघ दिसून आल्याने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. जंगल सफारी मिळाल्यानंतर त्यांनी हा संपूर्ण प्रकार वन विभागाचे अधिकारी व इतरांना सांगितला. एकाच वेळी चार वाघ दिसून आल्याने मेळघाटच्या वन्यप्राणी संगोपनाचे व सुरक्षेतेचे महत्व अधोरेखित होत आहे.सातपुडा पर्वताचे वन परिक्षेत्र अमरावती, अकोला आणि बुलढाणा या परिसरात विखुरलेले आहे. या पर्वतीय क्षेत्रात विविध प्रकारच्या वनस्पती, सागवान, अर्जून, मोहन आदी विविध स्वरुपाची विपुल वनस्पती उपलब्ध आहे. तापी, शहानूर, सिपना ह्या नद्या पर्वतीय रांगातून वाहतात. तसेच याच परिसरात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल, रान गवा, रान म्हैस, काळविट, हरिण, कोल्हा, लांडगा इत्यादी वन्यप्राण्यांसह मोर, पांढरे बगळे, विविध प्रजातींचे पक्ष्यांचे अधिवास क्षेत्र ठरले आहे. मात्र पर्यावरणाचे संरक्षण, वन्यप्राण्यांचे नैसर्गिक जीवन जोपासण्याकरिता व विविध पक्ष्यांचे निवासस्थान या वनक्षेत्रात असल्याने 22 फेब्रुवारी 1974 मधे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करुन या व्याघ्र प्रकल्पाचे 1500.50 चौ.मी. कोअर क्षेत्र व 5285.60 चौ.मी.चे बफर क्षेत्र अतिसंरक्षीत करण्यात आले. या भागातील अनेक गावाचे पुर्नवसन झाल्याने वन्यप्राण्यांचा मुक्त संचार सुरू आहे. शिवाय सुरक्षित अधिवास क्षेत्र असल्याने दिवसेदिवस वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे.त्यामुळे विदर्भातील ताडोबा नंतर मेळघाटातील डोंगराच्या घनदाट जंगलात जंगली सफारीत वन्यप्राणी पाहण्याचा थरथराट सुखवाह ठरत आहे.
जंगल सफारीत विद्यार्थ्यांना घडले चार वाघांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 4:30 PM