अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारोह ३० एप्रिल रोजी पार पडणार आहे. या समारंभाला विद्यार्थी संघटना व आचार्य पदवीकांक्षींकडून विरोध होत आहे. याबाबत राज्यातील कृषी आचार्य पदवीधारक संघटनेने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ दरवर्षी ५ फेब्रुवारीला घेण्याची परंपरा आहे; मात्र गेल्या अठरा वर्षांपासूनची परंपरा विद्यापीठाने खंडित केली, असा आरोप विद्यार्थी संघटनांचा आहे. अशात ३० एप्रिल रोजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षांत समारंभात पदवी ग्रहण करण्यासाठी विद्यापीठाने आचार्य पदवीधारक विद्यार्थ्यांना पात्र केले, समारंभासाठी विद्यार्थांना कोविड चाचणी बंधनकारक केली आहे. या समारंभासाठी नोंदणी केलेल्या २०पैकी १८ आचार्य पदवीकांक्षींनी विद्यापीठ प्रशासनाला विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. या मुद्द्यावर कृषी आचार्य पदवीधारक संघटना, कृषी योद्धा संघटना, पदवीधर संघटना, प्रहार संघटना यांच्यासोबतच इतरही संघटनांनीही विरोध दर्शविला आहे.
--कोट--
ज्यांच्या कौतुकासाठी हा सोहळा आयोजित केला जात असल्याची बतावणी विद्यापीठ प्रशासन करत आहे, त्या विद्यार्थ्यांचा विरोध असताना डॉ. पंदेकृवि प्रशासनाचे धोरण विद्यार्थीविरोधी आहे.
- डॉ. रोहित चव्हाण, अध्यक्ष, कृषी आचार्य पदवीधारक संघटना
--कोट--
दीक्षांत समारोहाचे आयोजन कृषी विद्यापीठे परिनियमांची पायमल्ली करणारे आहे. ज्या ऑनलाईन सोहळ्याबद्दल सांगितले जात आहे, त्याला विद्यापीठ नियमावलीत थारा नाही.
- डॉ. संदीप बोंद्रे, आचार्य पदवीकांक्षी