महात्मा फु ले पॅरामेडिकल कॉलेजमधील प्रकारअकोला : मध्यवर्ती बसस्थानकामागे असलेल्या महात्मा फुले पॅरामेडिकल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा एक दिवसावर राहिली असतानाही परीक्षेचे प्रवेशपत्र न देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात मंगळवारी दुपारी गोंधळ घातला. या प्रकाराची माहिती सिव्हिल लाइन पोलिसांना मिळताच पोलिसांनी महाविद्यालयात धाव घेतली, त्यानंतर काही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्यात आले; मात्र २५ वर विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रच आले नसल्याचे सांगत त्यांना महाविद्यालयातून खाली हात परतावे लागले.महात्मा फुले पॅरामेडिकल महाविद्यालयात मंगळवारी दुपारी विद्यार्थ्यांची अचानक गर्दी झाली. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बुधवारपासून सकाळ आणि दुपारच्या सत्रामध्ये अंतिम परीक्षा सुरू होत आहे. परीक्षेच्या आधीच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देणे बंधनकारक आहे; मात्र महात्मा फुले पॅरामेडिकल महाविद्यालय प्रशासनाने या विद्यार्थ्यांना परीक्षेला एक दिवस बाकी असतानाही प्रवेशपत्राचे वितरण केले नाही. त्यामुळे एकत्रित आलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाच्या या कारभाराचा निषेध व्यक्त करीत नारेबाजी केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास येताच त्यांनी सिव्हिल लाइन पोलिसांना माहिती दिली. सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र परीक्षा देता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे सहा महिन्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितले. बराच वेळ गेल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीमुळे उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्यात आले; मात्र २५ च्यावर विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र नसल्याने या विद्यार्थ्यांची विचारणा केली असता, त्यांना उडवा-उडवीचे उत्तरे देण्यात आली. या प्रकारामुळे काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.महाविद्यालय प्रशासनाकडून प्रतिसाद नाहीयासंदर्भात महात्मा फुले पॅरामेडिकल महाविद्यालय प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संचालक डॉ. सुधीर ढोणे यांच्या दोन्ही भ्रमणध्वनीवर फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पाच ते सहा वेळा फोन करूनही प्रशासनाकडून या प्रकारासंदर्भात प्रतिक्रिया देण्यात आली नाही.परिक्षेसाठी १५0 विद्यार्थी बसले आहेत. पैकी ११0 विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र प्राप्त झाले आहे. हे विद्यार्थी या सत्रात परिक्षा देतील. उर्वरित ४0 विद्यार्थ्यांचे परिक्षा प्रवेशपत्र मिळणार आहेत. या विद्यार्थ्यांना जानेवारी २0१८ मध्ये परिक्षा देता येईल. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे.- डॉ. सुधीर ढोणे, संचालक, महात्मा फुले पॅरामेडिकल महाविद्यालय, अकोला
प्रवेशपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ
By admin | Published: April 19, 2017 1:35 AM