मनपातील महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जाणे अपेक्षित असताना याठिकाणी नेमका उलटा प्रकार पहावयास मिळत आहे. सभापती मनीषा भंसाली लाभार्थ्यांना याेजनांचा लाभ मिळावा, यासाठी आग्रही असल्या तरी या विभागातील कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याची परिस्थिती आहे. गरजू व पात्र महिलांसाठी शिलाई मशीन, ब्युटी पार्लर, वाहन प्रशिक्षण तसेच मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप, हाइजीन किट वाटप यांसह विविध योजनांचा समावेश आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांसह गरजू व पात्र महिलांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासन आग्रही नसल्याचे दिसत आहे. संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या संकटामुळे मनपा शाळेतील विद्यार्थिनींना हाइजीन किटचे सामूहिकरीत्या वाटप न करता सभापती मनीषा भन्साली यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मुख्याध्यापकांना २५ किटचे वाटप केले होते. त्यानंतर मुख्याध्यापकांनी सर्व किटचे वाटप करणे अपेक्षित होते. परंतु मागील चार महिन्यांपासून ४२० किटचे वाटप रखडल्याची माहिती आहे. मनपात एकापाठाेपाठ एक विविध घाेळ उघडकीस येत असतानाच आता शिक्षण विभागाचा घाेळ चव्हाट्यावर आल्यामुळे प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत.
किट आहेत कुठे?
काेराेनाच्या आनुषंगाने मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना ठराविक वेळेनुसार शालेय पाेषण आहाराचा पुरवठा केला जात आहे. अर्थातच, हायजिन किटसाठी पात्र असलेल्या विद्यार्थिनींच्या हातात सदर किट साेपविणे मुख्याध्यापकांना निश्चितच कठीण बाब नाही. परंतु सदर किट शिक्षण विभागासह काही ठराविक मुख्याध्यापकांकडे उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे किट आहेत कुठे? असा सवाल उपस्थित झाला आहे.