अकोला: विघ्नहर्ता, विद्येची देवता असलेल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांबद्दल लहान मुलांमध्ये विशेष आकर्षण व प्रेम राहते. गणेशाच्या अनेक रूपातील प्रतिमा रेखाटण्यासाठी विविध प्रकारच्या भन्नाट कलाकृती साकारल्या जातात. अशीच एक कलाकृती श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रेखाटली. ‘लोकमत’ या अवघ्या चार शब्दांचा यथोचित वापर करून इयत्ता तिसरी, पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी श्री गणेशाचे अतिशय सुंदर व देखणे रेखाचित्र तयार करून ते बुधवारी लोकमत व्यवस्थापनाला सप्रेम भेट दिले.गणेश उत्सवादरम्यान गणरायांच्या विविध प्रकारच्या आकर्षक व विलोभनीय मूर्ती तयार केल्या जातात. गणेश मूर्ती घडविणारे किंवा रेखाचित्र साकारणारे कलाकार मुक्तहस्तपणे रंगांची उधळण करून त्यांना अपेक्षित मूर्ती, रेखाचित्र तयार करतात. लहान असो किंवा मोठ्यांपर्यंत ‘बाप्पा’ सर्वांनाच हवाहवासा वाटतो. विशेषत: बच्चे कंपनीमध्ये गणपती बाप्पांबद्दल प्रचंड आकर्षण, प्रेम व आत्मीयता दिसून येते. शहरातील श्री समर्थ पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि सहावीमध्ये शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अशीच कल्पना प्रत्यक्षात साकारली. ‘लोकमत’ या चार शब्दांचा योग्यरीत्या वापर करीत त्यामध्ये ‘श्रीं’चे अतिशय सुंदर व मनमोहक रेखाचित्र तयार केले. इथपर्यंतच न थांबता शाळेतील कला शिक्षक सौरभ महल्ले, नीतेश नागपुरे, गणेश गोरे व तुषार लांडे यांना सोबत घेऊन थेट गीता नगरमधील ‘लोकमत’चे कार्यालय गाठले. ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक आलोककुमार शर्मा, निवासी संपादक रवी टाले यांना साकारलेले रेखाचित्र सप्रेम भेट दिले. यावेळी वृत्तपत्र कसे तयार होते, याबद्दल विद्यार्थ्यांना असलेली जिज्ञासा ओळखून त्यांना थोडक्यात माहिती देण्यात आली. या विद्यार्थ्यांमध्ये पल्लवी सोळंके, पवन पोटे, प्रसन्न देव, समर्थ बाबर, समृद्धी बाठे, सृष्टी पागृत, रितेश मावळे, निकिता आंधळे, ईशीका देशमुख, श्रुती वर्मा, अनुष्का देशपांडे व शिवराज गावंडे यांचा समावेश होता.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ शब्दातून साकारला श्रीगणेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 2:33 PM
‘लोकमत’ या चार शब्दांचा योग्यरीत्या वापर करीत त्यामध्ये ‘श्रीं’चे अतिशय सुंदर व मनमोहक रेखाचित्र तयार केले.
ठळक मुद्देकलाकृती श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रेखाटली. सुंदर व देखणे रेखाचित्र तयार करून ते बुधवारी लोकमत व्यवस्थापनाला सप्रेम भेट दिले.लहान असो किंवा मोठ्यांपर्यंत ‘बाप्पा’ सर्वांनाच हवाहवासा वाटतो.