लोकमत न्यूज नेटवर्करोहणखेड: ग्रामीण भागातील जि.प. प्राथमिक मराठी शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला; मात्र अद्यापही शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही. मागील वर्षी शाळेमध्ये मिळालेले जुने गणवेश विद्यार्थी शाळेमध्ये घालून जात आहे. १५ ऑगस्ट यायला केवळ ७ दिवसच बाकी राहिले असून, जुन्याच गणवेशावर विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.मागील वर्षी शासनाने शाळा उघडल्यानंतर १५ दिवसातच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले होते; मात्र यावर्षी शाळा सुरू होऊन दीड महिना झाला; मात्र अद्यापही गणवेश वाटप झाले नसून, यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. यावर्षी शासनाच्या भोंगळ कारभारामुळे सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या मोफत गणवेश विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी चारशे रुपये दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील १४७ प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी ११ हजार ८२ एवढे लाभार्थी संख्य़ा आहे. या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ४४ लाख ३२ हजार ८00 रुपये शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे; परंतु यावर्षी शासनाच्या उदासीन धोरणामुळे पालकांना फारच हेलपाटे द्यावे लागत आहे. या अगोदर काही विद्यार्थ्यांंनी स्वत: खाते उघडले काही पालकांनी झीरो बॅलन्सवर खाते उघडले; परंतु पालकांनी काढलेले खाते पूर्ण व्यर्थ गेले आता शासनाने नवीन नियम काढला आता विद्यार्थ्यांना बँकेत खाते काढण्यासाठी विद्यार्थ्यांंना आईचे खाते काढावे लागणार तसेच पालकांना दुकानामध्ये दोन गणवेश चारशे रुपयात घेऊन त्यानंतर दोन गणवेशासाठी मुख्याध्यापक पैसे काढण्यासाठी चेक देतील; परंतु सध्या ग्रामीण भागात पंधरा दिवसांपासून पाऊस नाही. कोवळी पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. तसेच मजुरांना शेतात कामे नाही. मजूर घरीच बसला आहे. हातालाच काम नसल्याने पोट भरावे की विद्यार्थ्यांंना गणवेश आणावा, असे पालकांमध्ये बोलल्या जात आहे. तसेच तालुक्यातील अनेक शाळांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांंनी आईचे खातेसुद्धा उघडले नाही. त्यामुळे अजूनही ८0 टक्के विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. तरी वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांंना शाळेतच गणवेश वाटप करावे, अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील विद्यार्थ्यांंच्या बँक खात्यात गणवेशासाठी निधी जमा करण्यात आला असून, अनेक पालकांनी बँक खातेसुद्धा काढले नाही. शासनाच्या आदेशानुसार गणवेशाची अनुदानाची रक्कम व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा करता येत नाही. - संदीप मालवे, गटशिक्षणाधिकारी, अकोट
शालेय गणवेश घेण्यासाठी आम्ही पालकांना बँकेत खाते काढण्याच्या सूचना दिल्या तर काही पालकांनी खाते काढले; परंतु आता पुन्हा आईचे खाते काढण्यासाठी पालकांना सूचना दिल्या आहेत. - संदीप व्यक्ते, प्रभारी मुख्याध्यापक, रोहणखेड