फहीम देशमुख / शेगाव सैराट या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसप्रमाणेच यंगीस्तान मध्येही धुमाकूळ घातला आहे. युवा पिढीवर सैराटमधील तथाकथीत दृष्यांचे परिणाम झाल्याने पाल्यांना सैराट होऊ देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी पालकांना केले आहे. यासाठी शेगाव पोलिसांनी एक पाऊल पुढे जात शाळांमध्ये पोहोचून याबाबत विद्यार्थ्यांना धडे देण्याची योजना आखली आहे. चित्रपट सृष्टीत सैराट या मराठी चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली असल्याने दिवसेंदिवस या चित्रपटाची लोकप्रियता वाढत चालली आहे; मात्र याच सिनेमामुळे तथाकथीत दृष्य व वर्णन युवावर्ग स्वत:च्या आयुष्यात पाहत असल्याने युवापिढीचे नुकसान होत आहे. असे होऊ नये, यासाठी बुलडाणा पोलिसांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. नुकतेच शेगाव पोलिसांनी पाल्यांना सैराट होऊ देऊ नका, त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्यांना मोबाइलपासून दूर ठेवा, शाळेमध्ये जात आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्या, शिकवणी वर्गाच्या वेळांबाबत माहिती घ्या, असे आवाहन पालकांना केले आहे. शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यशवंत बाविस्कर व डीबी पथक गुरुवारपासून नवीन मोहीम हाती घेणार असून, प्रत्येक शाळा, महाविद्यालयात पोहोचून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून शहरातील खासगी शिकवणी वर्गचालकांना रात्रीच्या शिकवणीवर बंदी, सिनेमा टॉकीजवाल्यांना सूचना, शिक्षकांना मार्गदर्शन याशिवाय शहरात दोन चिडीमार पथके कार्यान्वित करणार आहेत. या पथकांना युवक-युवती सापडल्यास सर्व प्रथम त्यांच्या आई -वडिलांना पाचारण करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून पालकांच्या स्वाधीन करणार आहेत.
विद्यार्थ्यांनो, ‘सैराट’ होऊ नका!
By admin | Published: June 29, 2016 12:27 AM