- संतोष येलकर अकोला : यावर्षीचे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शासनामार्फत निधी प्राप्त झाला नसल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्त्याचे वितरण रेंगाळले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’चा ‘आधार’ मिळणार केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत दहावीनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह व इतर खर्च भागविण्यासाठी दरवर्षी ५१ हजार रुपये भत्ता देण्यात येतो. वर्षातून दोनदा विद्यार्थ्यांना भत्त्याचे वितरण करण्यात येते; परंतु २०१९-२० यावर्षीचे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्ता वितरित करण्यासाठी शासनामार्फत अद्याप निधी प्राप्त झाला नाही.निधीअभावी अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना भत्त्याचे वितरण रेंगाळले आहे. त्यानुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना भत्त्याचे वितरण करण्यासाठी शासनामार्फत जिल्हानिहाय निधी केव्हा प्राप्त होणार आणि विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’चा ‘आधार’ केव्हा मिळणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यासाठी हवे ८ कोटी!डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात अकोला जिल्ह्यातील २ हजार ३१ विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झाले. या विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्ता वितरित करण्यासाठी समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत ८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडे करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्ता देण्यासाठी ८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडे करण्यात आली आहे. निधी उपलब्ध होताच भत्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.- अमोल येवलीकरसहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, अकोला.