लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी तासिकांना उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे केल्यानंतर राज्यात अमरावती व लातूर विभाग वगळता, बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्था करण्यात आली; परंतु राज्यातील ८0 टक्के कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी तासिकांना हजर राहात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शिकवणी वर्गांमुळे महाविद्यालये ओस पडत आहेत. अमरावती विभागातसुद्धा महाविद्यालयांमध्ये ओस आणि शिकवणी वर्गांमध्ये विद्यार्थी भरघोस, अशी परिस्थिती आहे.राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये खासगी शिकवणी वर्गांचे मोठे पीक आले आहे. विद्यार्थी केवळ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात; परंतु तासिकांना हजेरी लावत नाहीत. महाविद्यालयांपेक्षा शिकवणी वर्गातील तासिका विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या वाटतात. परिणामी, कनिष्ठ महाविद्यालये ओस पडत आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी करण्यात आल्यानंतर शासनाने अकोला व लातूर विभाग वगळता बायोमेट्रिक उपस्थिती लागू करण्यात आली. सुरुवातीला बायोमेट्रिक उपस्थितीचा परिणाम दिसू लागला; परंतु काही महिन्यांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांची संख्या रोडावली. विज्ञान शाखेचे विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिकेला हजेरी न लावता, केवळ कोचिंग क्लासेसच्या शिक्षणावर भर देत आहेत. कोचिंग क्लासेस संचालकांनी स्वत:चे स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालये सुरू केली आहेत. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी खासगी कोचिंग क्लासेससोबत सामंजस्य करार केले आहेत, त्यामुळे बायोमेट्रिक उपस्थितीचा फज्जा उडाला आहे. कनिष्ठ महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसमध्ये संगनमत असून, नावापुरते बायोमेट्रिक उपस्थिती दाखविण्यात येत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने कडक पाऊले उचलावी, अशी मागणी होत आहे.
कनिष्ठ महाविद्यालये ओस, शिकवणी वर्गांमध्ये विद्यार्थी भरघोस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 2:25 PM