अकोला : देशातील विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना आता अँटेस्टेशन (साक्षांकन)साठी सक्षम अधिकार्याच्या मागे फिरण्याची गरज राहणार नाही. विद्यार्थ्यांना आता सेल्फ-अटेस्टेशनचे (स्वसाक्षांकन) अधिकार देण्यात आले असून, विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना याची अमलबजावणी एक आठवड्याच्या आत सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यापीठांमध्ये विविध शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, जन्म दाखला व इतर महत्त्वाच्या कागदापत्रांच्या छायांकित प्रती साक्षांकित करुनच सादर कराव्या लागत होत्या. त्या साक्षांकित करण्याचे अधिकार राजपत्रित अथवा सक्षम अधिकार्यांना देण्यात आले होते. त्यामुळे कागदपत्र साक्षांकित करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम अधिकार्यांचा शोध घ्यावा लागत असे. अनेकवेळा साक्षांकनासाठी पैसेदेखील मोजावे लागत असतं. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन होता. साक्षांकित कागदपत्रे नसल्यामुळे अनेकवेळा विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज नाकारल्याच्या घटनाही घडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने यापुढे विद्यार्थ्यांना स्वसाक्षांकनाची मुभा दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांना स्वसाक्षांकनाला मंजूरी देण्यात यावी, असा आदेश पाठविला आहे. अँटेस्टेशनची प्रक्रिया रद्द करुन स्वसाक्षांकित कागदपत्रांची पद्धती तातडीने अंमलात आणावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. ही पद्धती लागू केल्याचा अहवाल आठवडाभरात आयोगाला पाठविण्यात यावा, असेही आदेशात नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांनो आता करा ‘सेल्फ-अँटेस्टेशन’
By admin | Published: October 08, 2014 1:06 AM