पणज : अकोट तालुक्यातील पणज येथून अकोट येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात. मात्र, बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबबात विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखांना भेटून बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. बस सेवा सुरू झाली, मात्र बसचालक बसथांबा असूनही बस थांबवित नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पुन्हा अकोट आगारात धडक देत तक्रार दिली.
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन काळात एसटी बससह शाळा बंद करण्यात आल्या होत्या. अनलॉक प्रक्रियेत बस सुरू झाली. त्यानंतर शाळाही सुरू झाल्या. ग्रामीण भागात अद्यापही बससेवा पूर्ववत न झाल्याने विद्यार्थ्यांना बाहेरगावी शाळेत जाण्यासाठी खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत होता. बससेवा बंद असल्याने खासगी वाहनचालक विद्यार्थ्यांकडून ज्यादा भाडे वसूल करीत असल्याचे चित्र होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखांना भेटून बससेवा सुरू करण्याची मागणी केली. मात्र, अद्यापही बससेवा सुरू झाली नाही. बुधवारी पुन्हा सामाजिक कार्यकर्ते दिनेश बोचे यांनी विद्यार्थ्यांसोबत आगारप्रमुखांची भेट घेऊन बससेवा सुरू करण्याची मागणी केली. बुधवारी सकाळी परतवाडा डेपोची एमएच ४० वाय ५७५४ या बसचालकाने पणज येथे बस न थांबवताच सरळ नेल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता उशीर झाल्याची तक्रार आगारप्रमुखांकडे केली. आगारप्रमुखांनीही तत्काळ परतवाडा डेपोच्या प्रमुखांशी बोलून घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावेळी खिरकुंड फेरी लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिनेश बोचे, सौरभ बुंदेले, धीरज बेलसरे, सुजल महाले, यश आकोटकर, प्रज्वल अकोटकर, यश आवंडकार, प्रणव अकोटकर, गौरव अकोटकार, रेखाते यांची उपस्थिती होती. (फोटो)