ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 17- दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठ येथील नजीब अहमद हा गेल्या शंभर दिवसांपासून कॅम्पसमधून गायब झाला आहे. तसेच रोहित वेमुला या विद्यार्थ्यांची झालेली आत्महत्या ही जेएनयूसाठी अत्यंत शरमेची बाब असून, केंद्र सरकार एबीव्हीपीच्या इशा-यावर जेएनयूमधील विद्यार्थ्यांचा छळ करीत असल्याचा आरोप करीत स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन (एसआयओ)च्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
एसआयओचे उत्तर महाराष्ट्र कॅम्पस सचिव तौसिफ जाफर खान यांच्यासह एसआयओचे शेकडो सदस्य दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून, सरकारचा निषेध केला. जेएनयू विदयापीठातील अनेक विद्यार्थी बेपत्ता होतात, मात्र केंद्र सरकार यावर काहीच उपाययोजना करीत नाही.
कॅम्पस मधील विद्यार्थ्यांवर मारहाणीचे खोटे गुन्हे लावल्यानं आयुष्य उद्धवस्त करण्याचे प्रयत्न जाणूनबुजून करण्यात येत असून आता रोहित वेमुलानंतर अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना टार्गेट केलं जात आहे. आता नजीब अहमद या विद्यार्थ्याला कॅम्पसमधून गायब करण्यात आले असून अनेक दिवस झाले तरी त्याचा शोध घेण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप खान यांनी केला. यावेळी एसआयओचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .