- राजरत्न सिरसाट अकोला: शैक्षणिक दर्जा वाढावा, शिकविताना विद्यार्थ्यांना येणाºया अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थीच प्राध्यापकांचे मूल्यांकन करणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संचालक शिक्षण कार्यालयाच्यावतीने हा उपक्रम येत्या वर्षात राबविण्यात येणार आहे. तसेच नव्याने रुजू प्राध्यापकांनाही प्रशिक्षण देण्याचा कृषी विद्यापीठाचा प्रयत्न आहे.प्राध्यापक, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी परिश्रम घेतच असतात. तथापि, विद्यार्थ्यांना शिकविताना अनेक वेळा शेवटच्या बेंचवर बसणाºया विद्यार्थ्यांना ऐकू येत नाही किंवा अनेक अडचणी येतात, विषय समजत नाहीत, त्यामुळेच विद्यार्थी प्राध्यापकांचे मूल्यांकन करणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती अनिवार्य राहील. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून मिळणाºया निधीतून त्यासाठी ‘स्मार्ट क्लासरू म’ तयार करण्यात येणार असून, विशेष असे सॉफ्टवेवर विकसित करण्यात येणार आहे. फळ्यावर विद्यार्थ्यांना समजतेच; परंतु स्मॉर्ट क्लासरू ममधून प्रत्येक विषय सहज शिकविता येणार आहे. याला इंटरनेट, वायफाय आदी जोडणी केलेली राहील. पीक, एखादा पक्षी, चित्र थेट दाखवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन समाधान केले जाणार आहे. ही अत्याधुनिक नवीन शिक्षण प्रणाली आहे. शिक्षणासोबतच आता क्षेत्र प्रात्यक्षिकावर अधिक भर दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शेती, पिके, उत्पादन आदींचा अभ्यास होईल. गुणवत्तापूर्वक, परिणामकारक शिक्षणाचा हा एक भाग राहणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. प्राध्यापकांमध्ये शिकविण्याची स्पर्धा वाढण्यात मदत होईल, असाही यामागचा उद्देश आहे.कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असून, कृषी विषयात पदवी प्राप्त विद्यार्थी सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. कृषी शिक्षकांची संख्याही वाढत आहे. शासकीय कृषी महाविद्यालयात शिक्षकांची भरती केली जाते. या शिक्षक, प्राध्यापकांना आता (एआरएस) कृषी सेवा मंडळाच्या धरतीवर कृषी विद्यापीठात प्रथम दोन महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी हैदराबाद येथील ‘नार्म’सारख्या संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. म्हणजेच अॅकेडेमिक, शैक्षणिक तज्ज्ञांचा वर्ग घेण्यात येणार आहे.
कृषी शिक्षणाचा दर्जा उत्तम आहे. यात आणखी सुधारणा करण्याचे प्रयत्न आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांना उत्तमच शिकवितात; परंतु नवीन शिक्षण प्रणालीत आता विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येतात, त्याचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने विद्यार्थी शिक्षकांचे मूल्यांकन करणार आहेत. नवीन शिक्षक, तज्ज्ञांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.- डॉ. प्रदीप इंगोले,संचालक शिक्षण,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.