शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे नववी व दहावीतील विद्यार्थ्यांचे वर्षभराचे गुणांचे मूल्यमापन करून दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षा रद्द करण्यात आली. क्रीडा स्पर्धा झालेली नसताना दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे अतिरिक्त सवलतीचे गुण जाहीर केले. त्याचप्रमाणे एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेसाठी मिळणारे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव कलागुण देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एलिमेंट्री परीक्षा पास झाले; परंतु कोरोनामुळे इंटरमिजिएट परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनादेखील एलिमेंट्री परीक्षेचे ग्रेड गृहीत धरून वाढवून देण्याचा निर्णय झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे बोर्डाचा प्रस्ताव सादर आहेत, त्यांनादेखील वाढीव कलागुण मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे तसेच राज्यातील सर्व कलाध्यापक संघाच्या जिल्हास्तरावरून याकरिता सतत पाठपुरावा करण्यात आला होता. हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हिताचा निर्णय आहे.
- संजय आगाशे, अध्यक्ष, अकोला जिल्हा कलाध्यापक संघ