अकोला: सीताबाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून अवैध प्रवेश शुल्काची वसुली करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांकडून २४०० रुपयांची वसुली केली जात असल्याचा प्रकार सुरू असल्याने सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेने सीताबाई महाविद्यालयात आंदोलन केले. त्यामुळे महाविद्यालयाने शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली रक्कम परत देण्याची भूमिका घेतली आहे.शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जाऊ नये; परंतु दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कम थकीत असल्यामुळे यंदा महाविद्यालयाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून २४00 रुपये शुल्क वसुली केली. याला विद्यार्थ्यांसोबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने विरोध केला आणि प्राचार्य डॉ. आर.डी. सिकची यांची भेट घेऊन त्यांना महाविद्यालयाकडून होत असलेल्या नियमबाह्य शुल्क वसुली बंद करावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिला होता; परंतु त्यानंतरही महाविद्यालयाने शुल्क वसुली थांबविली नाही. त्यामुळे मंगळवारी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी सीताबाई महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना जाब विचारला. त्यानंतर प्राचार्य डॉ. आर.डी. सिकची यांनी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परत करण्याचे आश्वासन त्यांना दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत मिळणार आहे. (प्रतिनिधी)दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कम थकीत आहे. यासंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा केला; परंतु दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले. आता हे शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्यात येणार आहे.- डॉ. आर.डी. सिकची, प्राचार्य, सीताबाई महाविद्यालय.