लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे; मात्र जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांकडे ‘स्मार्टफोन’ उपलब्ध नाही. त्यामुळे ‘स्मार्टफोन’ नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणार कसे, यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत अद्याप नियोजन करण्यात आले नाही.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्याचे नियोजन शासनाच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीमध्ये यावर्षी ६८ हजार ३४६ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी २७ हजार ३३८ (४०टक्के) विद्यार्थ्यांकडे किंवा त्यांच्या पालकांकडे ‘स्मार्टफोन’ उपलब्ध नाही. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देणार कसे, यासंदर्भात तातडीने नियोजन करण्याची गरज असताना, जिल्ह्यात स्मार्टफोन नसलेल्या इयत्ता पहिली ते बारावीमधील गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभाग केव्हा नियोजन करणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र इयत्ता पहिली ते बारावीमधील ४० टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नसल्याने, या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यासंदर्भात आवश्यक असलेल्या उपाययोजनांचे नियोजन लवकरच जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत करण्यात येणार आहे.- चंद्रशेखर पांडे गुरुजी,शिक्षण सभापती, जिल्हा परिषद
‘स्मार्टफोन’ नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे नियोजनच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:40 AM