- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासकीय योजना, नवीन शैक्षणिक धोरणातील विविध संकल्पनांची अंमलबजावणी आणि त्याचा चर्चा करून निर्णय घेण्याच्या दृष्टिीकोनातून राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शालेय शिक्षण विभागातील महत्त्वाच्या विषयांसाठी अभ्यासगट स्थापन करण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार महत्त्वाच्या विषयांसाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आले आहेत.राज्यामध्ये खासगी शिकवणी वर्गांचे प्रस्थ वाढले असून, त्याचा परिणाम शाळा, महाविद्यालयांमधील उपस्थितीवर होत आहे. तसेच येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना नसल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक एसएससी बोर्डाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन केला आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे बंधनकारक आहे. त्या दृष्टिकोनातून विविध योजना राबविण्यात येतात. या योजना, त्यासंबंधीचे शासन निर्णय, परिपत्रके काढण्यात येतात; मात्र काम करताना, योजनांची अंमलबजावणी करताना, अडचणी येतात. अशावेळी योजना अधिक प्रभावीपणे, पारदर्शक पद्धतीने व्हावी, योजनांमध्ये काही त्रुटी आहेत का, नवीन शैक्षणिक धोरणातील योजनांमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे का, नवीन संकल्पना कोणत्या आहेत, याचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासगट स्थापन करण्यात आले आहेत. हे अभ्यासगट प्रत्येक विषयांचा विचार करून शिफारशी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे सादर करणार आहेत. यासोबत अनुदानित, विनाअनुदानित शाळा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, मूलभूत सुविधा, संचमान्यता, वेतनाचा प्रश्न आदी विषयांवर प्रभावी काम करता यावेत, यासाठी सुद्धा हे अभ्यासगट काम करणार आहेत. या अभ्यासगटामध्ये शिक्षण विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.कोणते आहेत अभ्यासगट?आरटीई प्रवेश प्रक्रिया, इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील शुल्क आकारणी, खासगी शाळांमधील कर्मचारी अधिनियमामधील सुधारणा, संच मान्यता व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, शिक्षकांना वेतन अनुदान देण्याऐवजी प्रतिविद्यार्थी अनुदान देणे, शाळा व विद्यार्थ्यांच्या छळाबाबत तक्रार निवारण्यासाठी कार्यपद्धती, विभागीय चौकशी व कार्यालय निरीक्षण, दप्तराचे ओझे कमी करणे, विविध संस्थांनी चालविलेल्या शाळांचे एकत्रीकरण, मुख्याध्यापकांची पदे सरळ सेवेने भरणे, केंद्र प्रमुख व पदांचे सक्षमीकरण, सैनिकी शाळा, विद्यानिकेतन यांची गुणवत्ता वाढविणे, न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा, माध्यान्ह भोजन योजना, पूर्व प्राथमिक शाळांचे नियोजन, डीएलईडी, बीएड अभ्यासक्रमाची उपयोगिता निश्चित करणे, स्वयंअर्थसहाय्यित शाळांचे संनियंत्रण, अल्पसंख्यक शाळांचे व्यवस्थापन, खासगी शिकवणी वर्गांचे संनियंत्रण, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अकरावी, बारावी अभ्यासक्रमाचे परीक्षण, शिक्षक, मुख्याध्यापकांची अशैक्षणिक कामे, मनपा शाळांची गुणवत्ता, उर्दू माध्य. शाळांची गुणवत्ता, शालेय मूल्यमापन, व्यावसायिक शिक्षण, शाळाबाह्य व स्थलांतरित मुले, शिष्यवृत्ती सुधारणा समिती यासह इतर विषयांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अभ्यासगट स्थापन केले आहेत.
दप्तराचे ओझे कमी करणार अभ्यासगटशासनाने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ५ नोव्हेंबर २0१४ रोजी निर्णय घेऊन उपाययोजना ठरविल्या आहेत. या उपाययोजनांमधील पुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी फ्रॅगमेन्टटेशन आॅफ टेक्स्ट बुक संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी गट स्थापन केला असून, हा गट दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.