....................................
राजराजेश्वर पुलाजवळ साचली जलकुंभी
अकोला : मोर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी आहे. पावसामुळे नदीच्या पाण्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वाहून आलेली जलकुंभी राजराजेश्वर पुलाजवळ येऊन साचली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून परिसरातील नागरिकांच्या आराेग्यास धोका निर्माण झाला आहे.
..................................
रस्त्यावरच वाहनांची पार्किंग
अकोला : शहरातील प्रमुख रस्त्यांच्या निर्मितीसह त्यांचे रुंदीकरणदेखील करण्यात आले. त्यामुळे अकोलेकरांना वाहतूककोंडीपासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, अनेक चारचाकी वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. गांधी रोड, सिव्हील लाइन्स लोड, नेकलेस रोड यासह शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवर चारचाकी वाहनांची पार्किंग केली जाते.
............................
काेराेनाचा संसर्ग कमी; धास्ती मात्र कायम!
अकोला : कोविडची दुसरी लाट आटोक्यात येत आहे; मात्र अद्यापही जिल्ह्यातील काेराेना संपलेला नाही. काेराेनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी नागरिकांमधील धास्ती संपलेली नाही, त्यामुळे आराेग्य यंत्रणा तिसऱ्या लाटेची तयारी करण्यात व्यस्त आहे.
......................
लसीकरण केंद्रांवरील गर्दी ओसरली
अकोला : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे लसीकरण केंद्रांवरील गर्दीही कमी झाल्याचे दिसू लागले आहे. गत आठवडाभरापासून लस घेणाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसत आहे, तर अनेक केंद्रांवर कूपन शिल्लक राहत असल्याचे चित्र आहे.
....................
डासांचा प्रादुर्भाव वाढला
अकोला : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून असल्याने डासांचीही उत्पत्ती वाढली आहे. परिणामी डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
...........................
रुग्णालयातच कोविड नियमांचे पालन नाही
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून कोविड नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.