लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानाचे स्थान आहे. निष्ठा जोपासणार्या कार्यकर्त्यांना पक्षाने नेहमीच महत्त्वाच्या जबाबदार्या सोपवल्या आहेत. त्यातुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये घराणेशाही रुजल्याचे सांगत सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
शुक्रवारी भाजप कार्यालयात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी काँग्रेस, राकाँतील ध्येयधोरणांचा चांगलाच समाचार घेतला. निष्ठावान कार्यकर्ता हा भाजपाचा आत्मा आहे. कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्षाचे काम सुरू राहते. याचा विसर इतर राजकीय पक्षांना पडल्यामुळेच भाजपमध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत. पक्षाचा विस्तार होत असताना पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून पुढील वाटचाल सुरु ठेवण्याचे आवाहन सहकार मंत्री ना.सुभाष देशमुख यांनी उपस्थितांना केले. यावेळी ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी सहकार मंत्र्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी मनपाचे स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, माजी आ. जगन्नाथ ढोणे, माजी महापौर सुमनताई गावंडे , चंदा शर्मा , सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार, योगीता पावसाळे, नंदा पाटील, रंजना विंचनकर, जयश्री दुबे, प्रा. उदय देशमुख, राजेश नागमते, रामदास तायडे , हरीश आलीमचंदानी, सतीश ढगे, अनुप गोसावी, डॉ. संजय शर्मा, श्रीकृष्ण मोरखंडे, रवी गावंडे, डॉ. विनोद बोर्डे, धनंजय गिरीधर, अनिल गावंडे, राजेश रावणकर, प्रकाश श्रीमाणे, गणेश कंडारकर , दिगंबर गावंडे, हरीश आमनकर, दिलीप सांगळे आदी उपस्थित होते.
पक्षाला नवसंजीवनी!पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून भाजप कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास झाला. त्यांच्या उसाची खरेदी न करणे, हमी भाव न देणे, बँकाँमधून कर्ज उपलब्ध न होऊ देणे, अशाप्रकारे भाजप कार्यकर्त्यांचा छळ केला. कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रामाणिक काम केल्यामुळे सोलापूर महापालिकेत भाजपाचा झेंडा फडकला असल्याचे ना.सुभाष देशमुख यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यात भाजपाची तटबंदी मजबूत असल्याचे पाहून आनंद झाल्याचे ते म्हणाले.