अकोला: मागील सर्वसाधारण सभा रद्द झाली तहकूब, अशी विचारणा विरोधकांनी केल्याने, या मुद्दयावरुन झालेल्या गोंधळात शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत केवळ २५ मिनीटात २२ विषयांना मंजूरी देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांनी मागणी केल्यानुसार शुक्रवारी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलविण्यात आली होती.सभा सुरु होताच, गत १२ फेब्रुवारी रोजी बोलविण्यात आलेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा रद्द झाली की, तहकूब झाली, तसेच विशेष सभेच्या नोटीससोबत विषयपत्रिका का देण्यात आली नाही, याबाबतची विचारणा विरोधी पक्ष नेता रमन जैन, सदस्य ज्योत्सना चोरे, महादेव गवळे यांनी केली. विषयपत्रिकेवरील विषयांवर पहिल्यांदा चर्चा करु, नंतर इतर विषयांवर चर्चा करण्याचे अध्यक्ष शरद गवई यांनी सांगीतले. १२ फेब्रुवारी रोजी बोलविण्यात आलेली सर्वसाधारण सभा तहकूब झाली की रद्द झाली, याचे उत्तर पहिल्यांदा द्या, अशी भूमिका विरोधी पक्षनेत्यांसह काही विरोधी सदस्यांनी घेतली. तसेच विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा करण्याची मागणी सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केली. या मुद्दयावरुन सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांमध्ये चांगलाच गोंधळ झाला. या गोंधळातच विशेष सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व २२ विषय मंजूर करण्यात आले. सभेच्या सचिवांनी सभागृहात वाचलेल्या एक-एक विषयाला सत्तापक्षाच्या सदस्यांनी आवाजी मताने मंजूरी दिली. दुपारी १.१५ वाजता सुरु झालेली विशेष सभा १.४0 वाजेपर्यंत चालली. या २५ मिनीटांच्या सभेत सर्व २२ विषय मंजूर करण्यात आल्याचे सांगत, सभा संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव, द्रौपदा वाहोकार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन ) के.आर.तापी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.सदस्यांमध्ये खडाजंगी!गोधळात विषयपत्रिकेवरील विषयांना आवाजी मताने मंजुरी देण्यात येत होती. त्यावेळी विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा करण्याची मागणी चंद्रशेखर पांडे गुरुजी व इतर काही सदस्यांनी केली. त्यावर सत्तापक्षाचे गटनेते विजय लव्हाळे, गोपाल गाडगे, शोभा शेळके, दामोदर जगताप व इतर सदस्यांनी विषयपत्रिकेवरील विषयांना चर्चा करून, मंजुरी देण्याची मागणी करीत होते. या मुद्दय़ावरून सत्ताधारी व विरोधी गटाच्या काही सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.विरोधक 'सीईओं'ना भेटले; न्यायालयात धाव घेणार!विशेष सभा संपल्यानंतर विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम. देवेंदर सिंह यांची भेट घेतली. घेण्यात आलेली विशेष सभा नियमबाहय़ असून, या सभेचे कामकाज आणि मंजुरी देण्यात आलेले विषय नियमबाहय़ असल्याचे त्यांनी ह्यसीईओंह्णना सांगितले. तसेच यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असून, न्यायालयात धाव घेणार असल्याचेही जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख व विरोधी पक्षनेता रमण जैन यांनी सांगितले.
२५ मिनीटात २२ विषय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2016 1:43 AM