अकोला : नावीन्यपूर्ण योजनेत जिल्ह्यात कोणती कामे करता येतील, त्यासाठी किती निधी लागेल, यासंदर्भात विभागनिहाय माहिती घेत, नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत करावयाच्या कामांची अंदाजपत्रके १५ जुलैपर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याचा ‘अल्टीमेटम’ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी जिल्ह्यातील यंत्रणांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतील कामांच्या प्रस्तावांचे सादरीकरण बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी उज्ज्वल चोरे, डॉ. आशा मिरगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील कामांसाठी निधी खर्चाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. तसेच २०१९-२० या वर्षात नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्यात करावयाची कामे आणि त्यासाठी लागणारा निधी यासंदर्भात विविध विभागांमार्फत प्रस्तावांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके येत्या १५ जुलैपर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याचा अल्टीमेटम जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणांना दिला. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, उपवनसंरक्षक सुधीर वळवी, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.कामांच्या ‘वर्क आॅर्डर’ १५ आॅगस्टपर्यंत द्या!नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांच्या प्रस्तावांना तातडीने प्रशासकीय मान्यता घेऊन, १५ आॅगस्टपर्यंत कामांचे कार्यारंभ आदेश (वर्क आॅर्डर) देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाºयांना दिले.नावीन्यपूर्ण कामांच्या प्रस्तावांचे असे करण्यात आले सादरीकरण!नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्यात करावयाच्या विविध कामांच्या प्रस्तावांचे सादरीकरण विविध विभागांमार्फत या बैठकीत करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या प्रकल्पामध्ये नवीन इमारतीमध्ये कॉन्फरन्स हॉल व विविध सुविधांची कामे आणि त्यासाठी लागणारा निधी यासंदर्भात प्रस्तावाचे सादरीकरण जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी केले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डायलिसिस मशीन खरेदीसाठी प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्याच्या ठिकाणी बाल विकास केंद्र उभारण्यासंदर्भात प्रस्तावाचे सादरीकरण बाल विकास विभागामार्फत करण्यात आले तसेच जाणीव जागृती अभियान कार्यक्रमांतर्गत प्रस्तावाचे सादरीकरण डॉ. आशा मिरगे यांनी केले.