अकोला: मोर्णा ते महान धरणापर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचा प्रस्ताव मनपाच्या सभागृहात १६ जुलै २0१५ रोजी मंजूर केला होता. त्यानुसार मजीप्राने प्राथमिक अहवाल तयार केला. शासनाने जलवाहिनीसाठी 'अमृत'योजनेंतर्गत निधी मंजूर केला असून, मजीप्राने तयार केलेला 'डीपीआर' तातडीने शासनाकडे सादर करण्यासंदर्भात सोमवारी महापौर उज्ज्वला देशमुख यांनी आयुक्तांसोबत पत्रव्यवहार केला.मोर्णा धरणात अकोला शहरासाठी ५ दशलक्ष घनमीटर जलसाठय़ाचे आरक्षण आहे. आरक्षित जलसाठय़ाचा अकोलेकरांसाठी वापर करण्याच्या उद्देशातून आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी मोर्णा ते महान धरणापर्यंत जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. शासनाने जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी २७ कोटींचा निधी मंजूर केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जलवाहिनी टाकण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करावा, यासाठी मनपात १६ जुलै २0१५ च्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानुसार मजीप्राने प्राथमिक स्तरावर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला. यादरम्यान, 'अमृत'योजने अंतर्गत मोर्णा ते महानपर्यंत जलवाहिनीचा समावेश करण्यात येऊन जलवाहिनी बदलण्यासाठी ३0 कोटींची तरतूद करण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार मनपाने 'डीपीआर'तयार करण्यासाठी मजीप्राच्या नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर केला. सद्यस्थितीत महान धरणातील उपलब्ध अत्यल्प जलसाठा लक्षात घेता, मजीप्राने त्यांच्याकडे तयार असलेल्या जुन्या 'डीपीआर'मध्ये तांत्रिक फेरबदल करत सुधारित ३0 कोटींचा 'डीपीआर' प्रशासकीय मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्याचे निर्देश महापौर उज्ज्वला देशमुख यांनी पत्राद्वारे मनपा आयुक्तांना दिले आहेत.
३0 कोटींच्या जलवाहिनीचा ‘डीपीआर’ सादर करा!
By admin | Published: April 26, 2016 2:01 AM