अकोला: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या इमारत दुरुस्तीच्या कामांचा प्रारूप आराखडा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत बुधवारी देण्यात आले.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांच्या इमारत दुरुस्तीची कामे, नवीन बांधकामे तसेच आरोग्य कर्मचारी निवासस्थानांची दुरुस्ती इत्यादी कामांचा प्रारूप आराखडा तातडीने तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद आरोग्य विभागाला या सभेत देण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद सेस फंडातून औषध आणि साहित्य खरेदीसाठी या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या सभेत समिती सदस्य पुष्पा इंगळे, प्रगती दांदळे, अनंत अवचार, गोपाल भटकर, डॉ.गणेश बोबडे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले व संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
लसीकरणाच्या नियोजनावर विचारणा!
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे काय नियोजन करण्यात आले, अशी विचारणा या सभेत समिती सदस्यांनी केली. लसीकरणापासून ग्रामीण भागातील नागरिक वंचित राहू नये, यासाठी लसीकरणाची मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.