अकोला: अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात जिल्ह्यातील विविध भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल सोमवारी सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिला.
१९ व २० मार्च रोजी जिल्ह्यातील सातही तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी आणि गारपीट झाली. अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या तडाख्यात जिल्ह्यात कांदा, उन्हाळी तीळ, भाजीपाला पिकांसह फळ पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल सोमवारी सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २१ मार्च रोजी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला. दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या काही भागात महसूल यंत्रणेमार्फत पीक नुकसानाचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून, जिल्ह्यातील पीक नुकसानाचे संबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांमार्फत पंचनामे करण्यात येणार आहेत.
अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील नुकसानाचा प्राथमिक अहवाल सोमवारी सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पीक नुकसानासह इतर नुकसानाचे तालुकानिहाय प्राथमिक अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होणार आहेत.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी