अकोला: अमरावती विभागातील प्राथमिक शिक्षकांचे गत दोन महिन्यांपासून २0 टक्के वेतन अनुदान प्रलंबित आहे. वेतन अनुदान मिळण्यासाठी शिक्षकांकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत; परंतु वेतन अनुदान मिळत नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मनीष गावंडे यांनी प्राथमिक शिक्षण संचालक जगताप यांच्यासोबत गुरुवारी चर्चा करून त्यांच्याकडे २0 टक्के वेतन अनुदान देण्याची मागणी केली.प्रत्येक वेळी प्राथमिक शिक्षकांना २0 टक्के वेतन अनुदानासाठी शासनाशी झगडावे लागते. गतवेळीसुद्धा सहा महिन्यांचे २0 टक्के वेतन अनुदान शासनाकडे प्रलंबित होते. वेतन अनुदान देण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून नेहमीच दुजाभाव केला जातो. पुरेसा निधी असूनसुद्धा शिक्षकांना वेतन अनुदान दिले जात नाही. आतासुद्धा दोन महिन्यांपासून वेतन अनुदान प्रलंबित आहे. त्यामुळे शिक्षकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्येविषयी राज्य खासगी शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मनीष गावंडे यांनी प्राथमिक शिक्षण संचालक जगताप यांच्याशी संपर्क साधून त्यांना या समस्येविषयी अवगत केले आणि त्यांच्याकडे शिक्षकांचे प्रलंबित वेतन अनुदान तातडीने देण्याची मागणी केली. यावेळी शिक्षण संचालक जगताप यांनी वेतन अनुदानाचे लवकरच वितरण करण्यात येईल आणि वेतनाचा प्रश्न निकाली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे शिक्षकांना १५ जानेवारीपर्यंत वेतन मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)