अकोला : कृषी अभियांत्रिकी शाखेत पदवीप्राप्त अभियंत्यांना (बी.टेक.) पदव्युत्तर अभियांत्रिकी (एम.टेक.) प्रवेशासाठी आयाेजित राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा (गेट) मध्ये अकाेल्याच्या डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देशातील पहिल्या पाच विद्यापीठांत स्थान मिळवित यश संपादन केले आहे.
गेट परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागांत अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चाैथे स्थान प्राप्त केले आहे. या यादीमध्ये कृषी विद्यापीठ, बंगळुरू, तामिळनाडू कृषी विद्यापीठ, कोइम्बतूर, कर्नाटक पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, बिदर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व डॉ.राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ, पुसा यांचा समावेश आहे. कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या द्वारकेश घाटोळ (अखिल भारतीय प्रवेश गुणवत्ता क्रमांक ०६), हर्षल वंजारी (०९), नुपूर काळबांडे (११५), सौरभ गायकवाड (१३९) व अलोक शेंडे (१६४) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले, अधिष्ठाता कृषी डॉ.महेंद्र नागदेवे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर वडतकर यांच्या परिश्रमाचे काैतुक हाेत आहे.