अकोला : कोविडच्या इतर रुग्णांसोबतच गर्भवतींसाठीदेखील सर्वोपचार रुग्णालयातील प्रसुती केंद्र राखीव ठेवण्यात आले होते. मागील वर्षभरात सुमारे १५० कोविडग्रस्त गर्भवतींची या ठिकाणी प्रसुती झाली असून, एकाही नवजात शिशुला कोविडची लागण झाली नाही. वयोवृद्धांप्रमाणेच गर्भवतींनाही कोविडचा धोका असतो. त्यामुळे गर्भवतींची विशेष निगा राखणे आवश्यक असून, एका गर्भवतीकडून इतर गर्भवतींना कोविडची लागण होऊ नये, या अनुषंगाने कोविडग्रस्त गर्भवतींसाठी सर्वोपचार रुग्णालयात खाटा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. कोविडच्या दुसऱ्या लाटेत गरोदर महिलांना लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सर्वाेपचारमध्ये आतापर्यंत १५० गरोदर महिलांची प्रसुती करण्यात आली आहे. यातील सर्व माता आणि शिशू सुरक्षित असल्याची जीएमसी सुत्रांची माहिती आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचे स्वरूप बदलल्याने संसर्गाचा वेग आणि लक्षणांची तीव्रताही बदलली आहे. त्यामुळे गरोदर महिलांनी कोविड बाधितांच्या संपर्कात येऊ नये. गरोदर काळात वैद्यकीय चाचण्यांसाठी महिलांना बाहेर पडावे लागते. अशावेळी गर्दीशी संपर्क येऊन कोविडची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णालय परिसरात वावरताना गरोदर महिला आणि मातांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून विशेष खबरदारी
कोविडग्रस्त गर्भवतींच्या प्रसुतीदरम्यान नवजात शिशुला कोविडचा संसर्ग होऊ नये, यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. पीपीई किट परिधान करून प्रसुती करणे हे डॉक्टरांसोबतच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही जिकरीचे काम आहे.
सर्वोपचार रुग्णालयात दाखल कोविडग्रस्त गर्भवतींची आतापर्यंत यशस्वी प्रसुती करण्यात आली आहे. एकाही शिशुला कोविडची लागण झाली नसून, त्यांचे आराेग्य चांगले आहे. यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून विशेष खबरदारी घेतली जाते.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकाेला