अकोला : नर किंवा मादी जन्माला येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु अकोल्यात लिंगवर्गीकृत रेतनाच्या माध्यमातून मादी रेडा पैदाशीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता म्हैस हवी की रेडा हेदेखील पशुवैद्यकाला ठरविता येणार आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरअंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या पशुप्रजनन विभागामार्फत अकोल्यात ‘म्हशींमध्ये लिंगवर्गीकृत रेतनमात्रेचा गर्भधारणेकरिता परिणाम’ हा संशोधन प्रकल्प यशस्वी राबविण्यात आला. या संशोधन प्रकल्पासाठी आत्मा प्रकल्प संचालक अकोला यांच्याकडून एक लाख रुपये निधी प्राप्त झाला होता. वळू संगोपन करून गाय किंवा म्हैस फळवणे व पुढील वेतासाठी तयार करणे ही खर्चिक बाब पशुपालकांना परवडणारी नाही. त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे म्हैस फळवणे सध्याच्या परिस्थितीत सोपे झाले आहे, परंतु कृत्रिम रेतनाद्वारे गर्भधारणा करूनही नर रेडक्याची पैदास झाल्यास पशुपालकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. गर्भनिर्मिती होताना नर किंवा मादीचा गर्भ तयार होणे हे शुक्राणू ठरवतात. याचा शोध बऱ्याच दशकांपूर्वी लागला, मात्र सद्य:स्थितीत नवीन तंत्रज्ञानाद्वारे शुक्राणुच्या केंद्रातील जणुकांच्या प्रमाणाचे मापन करून शुक्राणुंचे लिंगवर्गीकरण करण्यात येते. लिंगवर्गीकृत शुक्राणुपासून गोठीत विर्यकांडी तयार करण्यात आल्या आहेत. त्याच्या वापर कृत्रिम रेतनासाठी करण्यात येतो. याच माध्यमातून लिंगवर्गीकृत रेतनाद्वारे मादी रेडके पैदाशीचा प्रयोश यशस्वी करण्यात आला. या प्रयोगासाठी पशुप्रजनन व प्रसूतीशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. महेशकुमार इंगवले यांनी प्रकल्प प्रमुख कार्य पाहिले, तर प्रकल्पाच्या अंमलबजावणीत पशुप्रजनन व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. चैतन्य पावशे, डाॅ. सुजाता सावंत, डॉ. प्रवीण शिंदे, पी. डी. पाटील यांनी सहकार्य केले. प्रवीण घाटोळ व सुशांत घोगटे या पशुपालकांच्या प्रक्षत्रांना संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता व चमून भेट देऊन जन्मलेल्या मादी रेडक्याची पाहणी केली.
ही आहेत लिंगवर्गीकृत कृत्रिम रेतनाचे फायदे
लिंगवर्गीकृत कृत्रिम रेतनाच्या वापरामुळे म्हैस की रेड्याची पैदास करायची हे पशुवैद्यक ठरवू शकतो. त्यामुळे दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी मादी रेडक्यांची पैदास करणे शक्य आहे. उत्तम वंशावळ असणारी पुढील म्हशींची पिढी निर्माण होईल. नर रेडक्याच्या जन्मास अटकाव करणे शक्य असल्याने संगोपन खर्च कमी होईल.