अकोला : दक्षीण-मध्य रेल्वेच्याअकोला ते पूर्णा ब्रॉडगेज लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम झपाट्याने सुरु असून, आतापर्यंत पूर्णत्वास आलेल्या अकोला ते लोहगडपर्यंतच्या विद्युतीकरणाची चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून बुधवार, २४ मार्च रोजी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान निरीक्षण रेल्वे ताशी १०० किमी वेगाने धावल्याने ही चाचणी यशस्वी झाल्याचे मानले जात आहे.दक्षीण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील विविध लोहमार्गांचे विद्युतीकरण करण्यात येत आहे. यापैकी अकोला ते पूर्णापर्यंतच्या टप्प्याचे काम वेगात सुरु असून, या टप्प्यात अकोला ते अमानवाडीपर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या पूर्ण झालेल्या कामापैकी लोहगड ते अकोलापर्यंतच्या विद्युतीकरणाची दक्षिण-मध्य रेल्वेच्या सुरक्षा आयुक्त ए. के. रॉय यांनी बुधवारी चाचणी घेतली. नांदेड येथून आलेल्या विशेष निरीक्षण रेल्वेद्वारे बुधवारी लोहगड येथून चाचणीला सुरुवात करण्यात आली. सकाळी ११.४५ वाजता लोहगड येथून रवाना झालेली निरीक्षण रेल्वे दुपारी १२.४५ वाजता अकोल्यात दाखल झाली. या चाचणीदरम्यान रेल्वे ताशी १०० किमी वेगाने चालविण्यात आली. चाचणी पूर्ण झाल्यानंतर निरीक्षण रेल्वे दुपारी परत नांदेडकडे रवाना झाली. या चचणीसाठी नांदेड विभागाचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक कर्मचारी उपस्थित होते.
लोहगड ते अकोला विद्युतीकरणाची यशस्वी चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 10:34 IST