गहू, हरभऱ्यासह सत्रा बागांना तडाखा: घर कोसळून चार जखमीअकोला : अकोट व तेल्हारा वगळता जिल्ह्यातील अन्य पाच तालुक्यांत गुरुवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळासह झालेल्या पावसामुळे गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले, तसेच संत्रा बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बार्शीटाकळी तालुक्यात पावसाने घर कोसळून चार जण जखमी झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सोंगून ठेवलेल्या तुरीचेही पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पातूर तालुक्यात आलेगाव, बाभूळगाव, देऊळगाव, चान्नी, मळसूर, उमरा, राहेर, दिग्रस बु. व हिंगणा येथे वादळासह जोरदार पाऊस झाला, तर आगीखेड, शिर्ला, खामखेड, भंडारज, कोठारी बु., चेलका, पार्डी, तांदळी व सस्ती या भागात गारपीट झाली. पातुरात पोलीस स्टेशन ते वाशिम रस्त्यावरील अनेक झाडे वादळामुळे उन्मळून पडली. तालुक्यातील संत्रा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिर्ला येथील सुहास कोकाटे यांच्या संत्रा पिकांचे आठ लाखांचे नुकसान झाले. वादळामुळे अनेक ग्रामस्थांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. बार्शीटाकळी तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे नाफेडच्या खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांनी आणलेली तूर परत नेली. तालुक्यात चोहोगाव, धाबा, चिंचोली रुद्रायणी, लोहगड, सायखेड व कोथळी खुर्द येथे गारपीट झाली, तर महान, पुनोती, मांगुळ, मिर्झापूर, निंबी चेलका, सुकळी, राजनखेड, जामवसू आदी गावांमध्ये वादळासह जोरदार पाऊस झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी काहींनी लोहगड येथील घरात आश्रय घेतला; मात्र ते घर कोसळल्याने चार जण जखमी झाले. त्यातील एक गंभीर जखमी आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथे घर कोसळले, तसेच गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान झाले. धाबा येथे एका झाडावर वीज कोसळली. बाळापूर तालुक्यात शहरासह हातरूण व परिसरात जोरदार पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यात मूर्तिजापूर शहर, कुरूम व इतर ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अकोला शहरासह काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला
अवकाळी पावसाचा रब्बीला फटका
By admin | Published: March 16, 2017 6:28 PM