अकोला: गत आठ दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस सुरू आहे. शुक्रवारी रात्री जिल्हय़ात विजेच्या कडकडाटांसह पुन्हा जोरदार पाऊस कोसळला. यामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले आहे.२८ फेब्रुवारीपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी १३५.0८ मिमी तर १ मार्च रोजी १0३.६ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर १0 मार्च रोजी आणखी ११ मिमी पाऊस पडला. ११ मार्च रोजी २२.८0 मिमी पाऊस पडला. दोन दिवसांच्या दडीनंतर पुन्हा शुक्रवारी रात्री ७ मिमी पाऊस पडला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. तसेच सुसाट्याचा वाराही सुटला होता. त्यामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी झाडे पडली. शुक्रवारी रात्री आकोटमध्ये १४ मिमी, उमरा येथे १६ मिमी, अकोलखेड येथे १५.७ मिमी पाऊस पडला. तसेच उगवा येथे ७ मिमी, आगर येथे ६ मिमी पाऊस पडला. तेल्हारा तालुक्यात १९ मिमी पाऊस पडला. पाथर्डी येथे ४ मिमी, हिवरखेड येथे ५ मिमी, माळेगाव येथे ४ तर पंचगव्हाण येथे ५ मिमी पाऊस पडला. वार्यामुळे काही गावांमध्ये झाडे पडली. या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या शेतामध्ये गहू व हरभरा पीक आहे. ही पिके सध्या काढणीला आली आहेत. अनेक शेतकर्यांनी शेतामध्ये पिके काढून ठेवली. मात्र, बाजार समितीत विक्री करण्यापूर्वीच पावसामुळे शेतमाल भिजला. परिणामी भिजलेल्या मालाची विक्रीही कमी भावात करावी लागत आहे.
अवकाळी पावसाचा कहर सुरूच
By admin | Published: March 15, 2015 1:26 AM