अकोला: कोल्हापूर येथे २२ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र संघात अकोल्याचा सुफीयान शेख याची निवड झाली आहे. जम्मू येथे ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सुफीयान महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. सुफीयान सलग चौथ्या वर्षी राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेत खेळप्रदर्शन करणार आहे, हे येथे उल्लेखनीय.१६ वर्षीय सुफीयान आपल्या घराण्याचा फुटबॉल वारसा पुढे नेण्यासोबतच अकोला जिल्ह्याची फुटबॉल क्रीडा परंपरा जोपासत आहे. सुफियानचे आजोबा शेख चांद हे अकोल्यातील पहिले संतोष ट्रॉफी प्लेअर आहेत. वडील फईम शेख महाराष्ट्र पोलीस विभागाचे स्टार फुटबॉलपटू आहेत. सध्या बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. सुफीयानला बालपणापासूनच फुटबॉलचे वेड आहे. लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे नियमित सराव करायचा. अलीकडच्या काळात सुफीयानराज्य-राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत आपल्या घराण्याचे नाव रोशन करीत आहे.मागील वर्षी उस्मानाबाद येथे झालेल्या स्पर्धेत सुफीयानने बीजीई पुणे संघासोबत झालेल्या अंतिम सामन्यात निर्णयात्मक गोल करू न क्रीडापीठ संघाला ३-० ने विजय मिळवून दिला होता. यावेळीही १७ वर्षांआतील मुलांच्या गटात क्रीडापीठ (पुणे) संघाने मुंबई विभागाला ३-२ ने पराभवाचा धक्का दिला. क्रीडापीठकडून सुफीयान शेखने तब्बल तीन गोल नोंदविले, हे येथे उल्लेखनीय.मागील तीन वर्षांपासून सुफीयान क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी पुणे येथे शिक्षण घेत आहे. प्रशिक्षक धीरज मिश्रा यांच्या मार्गदर्शनात सुफीयानची फुटबॉल वाटचाल यशस्वी सुरू आहे. आजोबा शेख चांद, वडील अब्दुल फईम, क्रीडा संघटक सय्यद जावेद अली यांचे मार्गदर्शन सुफीयानला वेळोवेळी लाभत असते.
असा आहे महाराष्ट्र संघस्टीव परेरा पुणे, कृष्णा उगले औरंगाबाद, तुषार देसाई, असरफ कुरेशी, ऋषभ खेसे, सुफीयान शेख सर्व क्रीडा प्रबोधिनी, विराज साळोखे, विशाल पाटील, जय कामत, संदेश कासार, अभिषेक भोपळे, करण प्रजापती, फैज सय्यद, प्रणव पिल्ले सर्व मुंबई, फैजान शेख अमरावती, तलहा अहमद नागपूर, तन्मय देवरे नासिक, राखीव खेळाडू सुयश साळोखे, भावेश मांडोळकर कोल्हापूर, सिद्धार्थ भोयर अमरावती, मनमत भुजबळ पुणे, शेख इब्राहिम औरंगाबाद यांचा समावेश आहे.