अकोला - पाटबंधारे विभागात वर्ग दोनच्या पदावर कार्यरत असलेल्या एका २३ वर्षीय युवा अधिकारी महिलेने गोरक्षण रोडवर असलेल्या सहकार नगरमधील एका खासगी महिला वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी संध्याकाळी उजेडात आली. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रचंड तणावात असल्याचे नमूद केले आहे.अमरावती येथील मूळच्या रहिवासी असलेल्या कस्तुरी राजेंद्र भडांगे या अकोला पाटबंधारे विभागात वर्ग दोन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आठ महिन्यांपूर्वी कस्तुरी भडांगे अकोला येथील पाटबंधारे विभागात रुजू झाल्या होत्या. त्यांचे आई-वडील हे अमरावतीला राहतात. गेल्या काही दिवसांपासून कस्तुरी या सहकार नगरमधील एका खासगी मुलींच्या वसतिगृहात राहत होत्या. संध्याकाळी त्यांनी प्रचंड तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाची माहिती खदान पोलिसांना देण्यात आली. खदान पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असता, त्यांच्याकडे चिठ्ठी आढळून आली. त्या तणावात असल्याने आणि जीवन कसे जगावे, हेच कळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी कस्तुरी यांचा मृतदेह सर्वोपचारमध्ये नेला. मंगळवारी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या सुपूर्द करण्यात आला. कस्तुरी यांच्या आई-वडिलांना माहिती मिळताच त्यांनी रात्री उशिरा अमरावतीवरून ते अकोला दाखल झाले होते. कस्तुरीच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय, हे पोलीस तपासात समोर येणार आहे.