जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : तालुक्यातील अकोला खुर्द येथील रामधन भावजी हेलोडे या शेतकर्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून ८ सप्टेंबर रोजी मानेगाव येथील पूर्णा नदीत पुलावरुन पाण्यात उडी घेवून आत्महत्या केली. ९ सप्टेंबर रोजी त्यांचा मृतदेह सापडला. रामधन हेलोडे (वय ४५ ) यांच्याकडे चार एकर शेती होती. त्यांच्याकडे स्टेट बँक जळगाव शाखेचे १ लाख रुपये कर्ज होते. यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे पीक परिस्थिती गंभीर असल्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. या मानसीक तणावात ८ सप्टेंबर रोजी ते प्रात:विधीसाठी जातो म्हणून बाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला ते घरी परत आले नाही म्हणून त्यांच्या पत्नीने बाबुराव गवई यांना शोध घेण्यास सांगितले. दरम्यान, रामधन हेलोडे यांनी पूर्णा नदीच्या मानेगाव येथील पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ९ सप्टेंबर रोजी हिंगणे बाळापूर या गावानजीक नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडला. याप्रकरणी जळगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.
कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: September 10, 2015 1:52 AM